चंद्रपूर-आज पुन्हा एकदा चंद्रपूर शहरात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी चंद्रपुरचे तापमान तब्बल ४८ डिग्री सेल्सिअस इतके होते. तर बुधवारी जगामध्ये सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांच्या यादीत चंद्रपूर चौथ्या क्रमांकावर होते. तर दक्षिण आफ्रिकेतील केप सेंट फ्रान्सिस या शहरात जगातील सर्वाधिक ५६.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दुसऱ्या क्रमांकावर कुवेतमधील मित्रिबाह(४८.६ डि. से.) तर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानमधील जाकोबाबाद(४८.५ डि. से.) येथे सर्वाधिक तापमान होते.
आज जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली शहरं. सध्या विदर्भात नवतपा सुरू आहे. या दरम्यान तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यातही सर्वाधिक तापमान हे चंद्रपूर आणि याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या शहराचे असते. त्यानुसार बुधवारी ४८ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. तर ब्रह्मपुरीचे तापमान ४७.५ डिग्री एवढे होते. शहराचे मंगळवारचे तापमान देखील जगात सर्वाधिक म्हणजे ४७.८ डिग्री सेल्सिअस एवढे वाढले होते. काल जगामध्ये चंद्रपूर सर्वाधिक तापलेले शहर म्हणून गणले गेले. त्यापाठोपाठ पाकिस्तानमधील जाकोबाबाद व नागपूर महानगरही तापले होते. या दोन्ही शहरांचे तापमान ४७.५ डिग्री सेल्सिअस होते.
मागील काही दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिकेने यासंदर्भात नागरिकांना आधीच सतर्क केले असून फारच आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे सुचविले आहे. चंद्रपूर शहरांमध्ये महानगरपालिके मार्फत मोठ्या प्रमाणात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था देखील वाटसरूंना थंड पाणी मिळेल यासाठी प्रयत्नरत असून प्रत्येक चंद्रपूरकर सुद्धा घरातून निघताना 'चेंज द बॉटल' या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहे. दुपारी लोक बाहेर पडण्यास टाळत आहेत. एरव्ही वर्दळ असणाऱ्या ठिकाणी आता शुकशुकाट दिसत आहे. लोक शितपेयांना पसंती देत आहेत. असे असतानाही उन्हाच्या झळा चंद्रपुरकरांना बसत आहे.
सध्या शाळा कॉलेज बंद असल्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून शाळकरी मुलांचा बचाव होत आहे. तथापी, प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ऊन्हामुळे त्रास होणाऱ्यांसाठी विशेष कक्ष स्थापन केले आहेत. नागरिकांनी त्याचा आवश्यकतेनुसार फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी या काळामध्ये स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.