चंद्रपूर - जिल्ह्यात एकामागून एक पावसाचे थैमान सुरू आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे तिसऱ्यांदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता याचा फटका मूल शहराला बसला आहे. या शहरातील अनेक घरांत पाणी घुसले आहे. तर, इरई धरणाचे सातही दरवाजे जवळपास दीड मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे, चंद्रपुरात शहरातील सखल वस्त्यांत पुन्हा पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बाबूपेठ येथील पंचशील चौकात घराची भिंत कोसळून मायलेक गंभीर जखमी झाले. मूल, सावली तालुक्यात दमदार पाऊस झाला. अंधारी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मूल - चंद्रपूर, सावली - जिबगाव - हरांबा हा मार्ग बंद झाला आहे.
नदी काठावरील आठ वस्त्यांना सतर्कतेचा इशारा -जुलै महिन्यात जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. १० ते १८ जुलैदरम्यान जिल्हाभरात संततधार पाऊस झाला. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. धरणाचेही दरवाजे उघडण्यात आल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली. मात्र, शुक्रवारी (ता. २२) रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला. रात्रीपासून पाऊस सुरूच आहे. पावसामुळे इरई धरणाचे सातही दरवाजे १.२५ मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे, प्रशासनाने नदी काठावरील आठ वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
घरावर बाजूच्या घराची भिंत कोसळली -शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बाबूपेठ येथील पंचशील चौकात राहणाऱ्या बारसागडे यांच्या घरावर बाजूच्या घराची भिंत कोसळली. या घटनेत आई आणि दोन छोटी मुले जखमी झाली. मंजू बारसागडे, आर्यन बारसागडे आणि प्रशिक बारसागडे अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावर, शहर संघटक रुपेश पांडे, सविता दंडारे, बादल हजारे, प्रतिक हजारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात जावून जखमी परिवाराची भेट घेतली. जखमींना आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्यात. शासनातर्फेही या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत.