चंद्रपूर -शहराच्या तापमानात वाढ झाली असून, पाऱ्याने 45 डिग्री ओलांडली आहे. यापासून सामान्य नागरिकांचा बचाव करण्यासाठी चंद्रपूर मनपाने ( Chandrapur Municipal Corporation ) उष्माघात कृती आराखडा तयार केला ( Heatstroke Action Plan ) आहे. सरकारच्या निर्णयानूसार उष्णाघातामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 2016, 2017, 2018 आणि 2019 मध्ये उष्माघात कृती आराखडा राबवण्यात आला होता.
यंदा 2022 च्या उन्हाळ्यात देखील मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराची देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून देखील नोंद करण्यात आलेली आहे.
मोबाईल टीम देखील कार्यान्वित - उष्माघात कृती आराखड्याच्या माध्यमातून मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांना देखील प्रशिक्षण देण्यात येईल. उष्माघातापासून बचाव कसा करावा, या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने नागरिकांपर्यंत हॅन्डबिल, पोस्टर बॅनरच्या माध्यमातून देखील माहिती पोहोचण्यात येणार आहे. उष्माघात प्रतिबंधक उपाय योजनांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांना व्हावी, यासाठी सिनेमागृह, बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन येथेही घोषणापत्र लावण्यात येणार आहेत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांमध्ये उष्माघात रुग्णांसाठी शीत कक्ष (कोल्ड वॉर्ड) कार्यान्वित करण्यात येणार असून, एक मोबाईल टीम देखील कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे.