चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोना बाधितांसाठी सध्या ऑक्सिजन बेडची संख्या पुरेशी आहे. मात्र, भविष्यात दररोजची कोरोना रूग्णसंख्या 500 च्या वर गेल्यास आपत्तीजनक परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे जिल्ह्यात अधिकचे ऑक्सिजन बेड निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक तालुका स्तरावरदेखील 20 ते 25 ऑक्सिजन बेड तयार ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल(रविवारी) रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार सुधीर मुनगुंटीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, प्र. जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.
गरज पडल्यास खासगी प्रयोगशाळांची मदत घ्या -
शासनस्तरावरून आरोग्यसेवेतील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी रिक्त पदांचा अडसर येऊ नये म्हणून शासकीय रूग्णालयाने 24 तास सेवा देणाऱ्या टेली-आयसीयुचा पर्याय स्वीकारण्याचे तसेच खाजगी डॉक्टरांचे मानधन ठरवून आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याही सेवा घेण्याच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत कोरोना आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळालाच पाहिजे. यासाठी आवश्यकता पडल्यास खासगी प्रयोगशाळेची मदत घेण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी दिल्या.