चंद्रपूर - आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यता असली की मोठी संकटेही नतमस्तक होऊन जातात. याचे उत्तम उदाहरण ठरलाय राजुरा शहरातील सादिक बंदेअली हा विद्यार्थी. शारीरिक अपंगाला न जुमानता त्याने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावी गाठली. एवढेच नाही तर वर्गातील हुशार विद्यार्थी अशी आपली ओळख निर्माण केली. भविष्यात सीए होण्याचे स्वप्न त्याने आपल्या उराशी बाळगले आहे.
सादिक लहाणपणापासूनच अपंग आहे. हातपाय जरी निकामी असले तरी त्याचा आत्मविश्वास दांडगा आहे. अपंगत्वाने खचून न जाता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी तो सज्ज आहे. शिक्षणाच्या या साधनेत त्याचे कुटुंबीय खंबीरपणे त्याच्यासाठी उभे आहेत. त्याचे पालक त्याला रोज शाळेत पोहोचवून देतात.