चंद्रपूर - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 31 ऑगस्टपर्यंतच देशात लॉकडाऊन लागू करण्याचे निर्देश होते. यानंतर जोवर केंद्राचे निर्देश येत नाही तोवर कुठेही टाळेबंदी घोषित करू नये, असे स्पष्ट निर्देश केंद्राने सर्व राज्यांना दिले. मात्र त्याचा पूर्वविचार करण्याआधीच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबरपासून संपूर्ण टाळेबंदी करण्याची घोषणा करून टाकली. यासंदर्भात अजूनही राज्य शासनाचे निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे चंद्रपुरातील जनतेत गोंधळाचे वातावरण आहे. याच भीतीपोटी नागरिक जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वीस दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव भयावहरित्या वाढला आहे. 10 ऑगस्टला जिल्ह्यात कोरोनाचे 898 रुग्ण होते तर पाच जणांचा यात मृत्यू झाला होता. 31 ऑगस्टपर्यंत रुग्णांची संख्या 2,647 तर मृतांचा आकडा हा 29 झाला. ज्या झपाट्याने ही आकडेवारी वाढत आहे , ती स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी 3 सप्टेंबरपासून जिल्ह्यात कडक टाळेबंदी करू अशी घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
केंद्राचे निर्देश येण्यापूर्वीच पालकमंत्र्यांची लॉकडाऊनची घोषणा; जनतेत संभ्रम कायम
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबरपासून संपूर्ण टाळेबंदी करण्याची घोषणा करून टाकली. यासंदर्भात अजूनही राज्य शासनाचे निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे चंद्रपुरातील जनतेत गोंधळाचे वातावरण आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी 29 ऑगस्टला ही घोषणा केली, याच रात्री केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश आलेत. जोवर केंद्राचे निर्देश येत नाही तोवर 1 सप्टेंबरपासून कुठल्याही राज्याने कुठेही टाळेबंदी घोषित करू नये अशा या स्पष्ट सूचना होत्या. म्हणजे एखाद्या जिल्ह्यात टाळेबंदी लावायची असेल तर हा प्रस्ताव आधी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे पाठवायचा. राज्य शासन तो केंद्राकडे पाठवेल आणि केंद्राच्या परवानगीनेच संबंधित जिल्ह्यात टाळेबंदी घोषित होईल. मात्र, यापूर्वीच पालकमंत्री वडेट्टीवार यांनी टाळेबंदीची घोषणा करून टाकली. याचा गंभीर परिणाम नागरिकांवर झाला. पुढील एक आठवडा कडक टाळेबंदी असणार त्यापूर्वी आपण आवश्यक वस्तू घेऊन घ्याव्या यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. बाजार आणि दुकानांत नागरिकांची गर्दी दिसू लागली. हे चित्र कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांवर विरजण टाकणारे आहे.
आधीच्या टाळेबंदीमुळे सर्व व्यापार ठप्प पडला. त्यात थोडी शिथिलता दिल्यामुळे कसाबसा व्यापाराचा गाळा सुरू आहे. याच दरम्यान टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे या क्षेत्रावर चिंतेचे सावट आहे. आज खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली असता व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींनी ही चिंता व्यक्त केली. तसेच खासदार धानोरकर यांनी देखील केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच टाळेबंदी लावण्यात यावी अशी भूमिका मांडली. यामुळे जिल्हा प्रशासनासमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जेईईची परिक्षा ही 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अशावेळी जिल्ह्यात टाळेबंदी लावली तर विद्यार्थी ही परीक्षा कशी देणार हा देखील प्रश्नच आहे. एकीकडे कोरोना वाढत असताना पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या घोषणेमुळे जो गोंधळ उडाला तो कोरोनाच्या स्थितीला आणखी चिंतेत पाडणारा आहे.