चंद्रपूर - लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात दारू सुरू करण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी आक्षेप घेतला होता. त्यातही दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री सुरु करणे, हा निर्णय अतर्क्य असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला बहुजन विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार यांनी अभय बंग यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. 'डॉ. बंग यांना दारू विषयी इतकाच आक्षेप असेल, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगून संपूर्ण देशातच दारुबंदी करून टाकावी. म्हणजे हा प्रश्न मुळासकट संपून जाईल. मात्र त्यामुळे देशात जी महसुलाची तूट होईल, ती भरून काढण्याचा तोडगाही त्यांनीच सुचवावा' अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...'दिल्लीत अडकलेले विद्यार्थी राज्यात परत येणार, केजरीवाल सरकारच्या संमतीची प्रतीक्षा'
चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविण्याच्या विषयावर डॉ. अभय बंग यांनी आक्षेप घेतला. त्यावर वडेट्टीवार यांनी बंग यांना प्रत्युत्तर दिले होते. आता या दोघांमध्ये उत्तर प्रत्युत्तराचा सामना रंगल्याचे पहायला मिळत आहे. डॉ. अभय बंग यांनी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू सुरू करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. देशात कोरोनामुळे जितके मृत्यू झाले. त्यापेक्षा दारूमुळे मरण पावणाऱ्या लोकांची संख्या ही हजार पटीने जास्त आहे. दारूच्या दुकानासमोर रांगेत लागल्यानंतर लोक कोरोना घेऊन घरी येतील, असेही त्यांनी म्हटले होते. यावर आता वडेट्टीवार यांनी उपरोधिक टीका केली आहे.
...तर डॉ. अभय बंग साहेबांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार झाले असते
'डॉ. बंग त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान मोदींनाच सांगून थेट संपूर्ण देशातच दारुबंदी करून टाकावी. म्हणजे डॉ. बंग यांच्या राज्यातील मागणीचा विषयच संपून जाईल. त्यांच्या संस्थेचे काम देखील बंद होईल. दरवर्षी दारूने पाच लाखांचा मृत्यू होतो, असे बंग म्हणतात. हे आकडे त्यांच्याकडे कुठून आले, हे त्यांनाच ठाऊक असतील. ते खुप मोठे व्यक्ती आहेत. त्यामुळे जी माहिती सरकारकडे नसते ती त्यांच्याकडे असते. सरकार चालवायला पैसे लागतात. त्यांची स्वयंसेवी संस्था चालवायला देखील पैसे लागतात. राज्यात सर्व उद्योग, कामधंदा बंद आहे. अशावेळी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम म्हत्वाचे असून असे काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र, बंग यांना दारू दुकाने सुरु करण्याबद्दल आक्षेप आहे. त्यांनी हा आक्षेप खरेतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडायला हवा होता. तेव्हाच संपुर्ण देशात दारूबंदी केली असती, तर आज महाराष्ट्रात देखील दारू बंद असती. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार झाले असते.' अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी डॉ. अभय बंग यांच्यावर खोचक टीका केली आहे.