चंद्रपूर -जिल्ह्यातील चिचपल्ली गावाजवळील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीला गुरुवारी (दि. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. ही इमारत बांबूपासून बनवण्यात येत होती. आगबाबत तत्काळ सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, घटनास्थळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.
कोट्यवधींचे नुकसान
आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी सुमारे 9 ते 10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.
काही दिवसांत होणार होते उद्घाटन
शहरालगत मूल मार्गावर चिचपल्ली गावाजवळ हा जागतिक दर्जाचे निर्माणाधिन बांबू संशोधन आणि प्रशिक्षण प्रकल्प आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली इमारत ही मुख्य प्रशासकीय इमारत आहे. सिंधुदुर्ग, आसाम आणि कोलकाता भागातून आणलेल्या विशेष बांबूंद्वारे ही इमारत उभारण्यात आली होती. केवळ बांबू वापरून उभारलेली ही आशियातील एकमेव इमारत असल्याने त्याचा जागतिक पातळीवर गौरव केला जात होता. इमारत निर्माणाधीन असल्याने पुढच्या काही काळात त्याचे उद्घाटन अपेक्षित होते. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली याबाबत चौकशीचे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहे.
हेही वाचा -वऱ्हाडाच्या मिनी ट्रक उलटला; 5 ठार 20 गंभीर