चंद्रपूर : वेकोली कोळसा खाणीत उत्खननाचे काम करणाऱ्या जीआरएन कंपनीतील तोडफोड प्रकरणी मनसे शहराध्यक्षासह सात जणांनी आत्मसमर्पण केले आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता मनदीप रोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुर्गापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्याची माहिती मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी दिली.
सात जणांचे आत्मसमर्पण
रोडे यांच्यासह आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये राहुल विजय मडावी, संदीप भैय्याजी आरडे, नितीन राजू बावणे, प्रवीण अशोक केराम, प्रफुल चंद्रशेखर पिसूर्डे, सुमित सुरेश करपे यांचा समावेश आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत मनीषा धात्रक आणि स्वाती राऊत यांचे देखील नाव आहे. मात्र, त्यांचा आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये समावेश नाही.
काय आहे प्रकरण?
भटाळी कोळसा खाणीत उत्खननाचे काम जीएनआर कंपनी करते. या कंपनीने स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्यावा या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी 17 फेब्रुवारीला कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. यापूर्वी अनेकदा मागणी करूनही कंपनी व्यवस्थापन काही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केली. यानंतर तोडफोड करणारे कार्यकर्ते पसार झाले होते. या प्रकरणी भादंवि कलम 395, 324, 325 आणि 147 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर दुर्गापुर पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक केली. मात्र, शहराध्यक्ष मनदीप रोडे आणि त्यांच्यासह अन्य सहा लोक फरार होते. अखेर महिनाभरानंतर मनदीप रोडेंसह सात जणांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.