चंद्रपूर: विख्यात समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांनी 2 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे. हे अजूनही एक गुढच आहे. मात्र, यापूर्वी निर्माण झालेला कौटुंबिक कलह आणि दुरावा याची किनार या घटनेला आहे. 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात शीतल आमटे यांच्या मृत्युच्या 8 दिवसांपूर्वी आमटे कुटुंबियांनी शीतल आमटे ह्या मानसिक ताण आणि नैराश्याचा सामना करत असल्याचे एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले होते. हेच पत्र शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांनी सोशल मीडियावर टाकत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर एक पोस्ट टाकत 'प्रश्न ज्यांची उत्तरे कधीच मिळू शकणार नाहीत' असे सवाल त्यांनी आमटे कुटुंबाला विचारले आहेत.
काय आहेत हे सवाल?30 नोव्हेंबर 2020 ला महारोगी सेवा समितीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन लावून आत्महत्या केली होती. यापूर्वी आमटे कुटुंबियात असलेला अंतर्गत कलह समोर आला होता. शीतल आमटे यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांवर काही गंभीर आरोप केले होते. तसेच संस्थेच्या कार्यप्रणालीबद्दल देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर 22 नोव्हेंबरला आमटे कुटुंबीयांनी एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिले होते. आमचे संपूर्ण आमटे कुटुंब या कामाशी मागील ३ पिढयांपासून समरस आहे. आमच्या कुटुबातील डॉ. सौ. शीतल गौतम करजगी (पूर्वश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) यांनी आमच्या संस्था कार्यात योगदान दिले आहे.
गौतम करजगी यांनी सवाल उपस्थित केले: तथापि डॉ. शीतल गौतम करजगी या सध्या मानसिक ताण, नैराश्य यांचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुली देत संस्थेच्या कामाबददल, विश्वस्तांबददल आणि कार्यकर्त्यांबददल अनुचित वक्त्यव्ये केली. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. डॉ शीतल गौतम करजगी यांच्या निवेदनामुळे कोणाचाही गैरसमज होऊ नये, म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करत आहे. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, हीच विनंती आम्ही सर्व करीत आहोत, असे यात नमूद होते. यात शीतल आमटे यांचे वडील डॉ. विकास आमटे, त्यांच्या आई भारती, काका डॉ. प्रकाश आमटे, काकू डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी होती. याच पत्राची पोस्ट टाकत यावर शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
आमटे कुटुंबियांवर टीका: आमटे यांच्या मृत्युला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी हे सवाल उपस्थित केले आहे. कुठेही वैद्यकीय प्रमाण नसताना पालकांनी ती (शीतल आमटे) नैराश्याने ग्रस्त असलेली रुग्ण आहेत, असा ठपका कसा काय लावला ? हे अनैतिक, बेकायदेशीर आणि अमानवीय नाही काय? जरी आपण गृहीत धरलं की, ती नैराश्याने ग्रस्त होती. तर तिला वाचविण्यासाठी कुटुंबाने प्रयत्न का नाही केले ? यातील सर्वच तर तज्ज्ञ डॉक्टर आणि करुणेचे पायीक होते ? तिच्यावर सार्वजनिक रित्या कडक टीका करण्याची काय गरज होती ? ते तर तुमचंच रक्त होतं ना ? त्यात तिची एवढीच चूक होती की, ती प्रामाणिक, सरळ आणि कणखर होती. महत्वाचं म्हणजे ती एक स्त्री होती. अशा शब्दांत गौतम करजगी यांनी आमटे कुटुंबियांवर टीका केली आहे.