मुघल बादशाहच्या काळात बनवलं गणपतीचं 'नाणं'; जाणून घ्या, नाण्याचा इतिहास चंद्रपूर : Ganesha Coin in Mughal Empire :आक्रमणकारी म्हणून मुघलांकडं बघितलं जातं. त्यामुळं मुघल साम्राज्याच्या काळात गणपतीचं नाणं तयार करण्यात आल्याचं जर कोणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. मात्र, हे सत्य आहे. अठराव्या शतकातील मुघल बादशाह शाह आलम द्वितीयच्या काळात हे गणपतीचे नाणं तयार (Mughal Empire Ganpati Coin) करण्यात आलं. मिरज संस्थानात तयार करण्यात आलेलं हे दुर्मिळ नाणं राष्ट्रीय पातळीचे ज्येष्ठ इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर यांच्या संग्रहालयात आजही पाहायला मिळतं.
सांगलीतील मिरज संस्थानात बनवलं नाणं : मुघलांच्या काळात अठराव्या शतकात मुघल बादशाह शाह आलम द्वितीयचं साम्राज्य होतं. सन 1759 ते 1806 पर्यंत त्यांनी राज्य केलं होतं. मिरज संस्थानही त्यांच्या साम्राज्याचा भाग होता. हे संस्थान मराठ्यांचा अधिपत्यात चालत होतं. त्यावेळी चिंतामण पटवर्धन हे संस्थानिक म्हणून कारभार पाहत होते. पटवर्धन घराण्याचं आराध्यदैवत गणपती होतं. त्यामुळं पटवर्धन यांच्या पुढाकारातून या नाण्याची टाकसाळ तयार करण्यात आली. विशेष म्हणजे तेव्हा मुघल साम्राज्य असूनही या नाण्याला कुठलाही विरोध झाला नाही.
दुर्मिळ नाण्याचं महत्त्व : या नाण्यावर देवनागरी आणि फारसी या दोन्ही भाषांचा वापर करण्यात आलाय. देवनागरी लिपीत 'गणपती' तर फारसी भाषेत 'शाह आलम बादशाह गाझी' आणि 'हिजरी वर्ष 1202' असं कोरण्यात आलंय. नाण्याच्या पृष्ठभागी देवनागरी लिपीत 'पंतप्रधान' तर फारसी भाषेत 'मैमनत माणूस' आणि टाकसाळेचे नाव 'मुर्तुजाबाद (मिरज) अंकित' आहे.
इतिहासात अनन्यसाधारण किंमत :या चांदीच्या नाण्याचं वजन 11.34 ग्राम आहे. पंतप्रधान ही पेशव्यांच्या काळात पदवी होती. पेशव्यांप्रति निष्ठा व्यक्त करण्यासाठी पटवर्धन यांनी हा मजकूर प्रसिद्ध केला होता. त्याकाळी कुठल्याही संस्थानिकांच्या राजाचं शासन असलं तरी नाणी मात्र दिल्लीत विराजमान असलेल्या बादशाहच्या नावावर बनवली जायची. विशेष म्हणजे मुघल साम्राज्याच्या संपूर्ण कार्यकाळात असं नाणं कधीच बनलं नाही. गणपतीच्या नावानं फारसी आणि देवनागरी लिपीचा प्रयोग करून तयार करण्यात आलेलं हे अत्यंत दुर्मिळ नाणं आहे, ज्याची इतिहासात अनन्यसाधारण किंमत आहे.
हेही वाचा :
- Ganesh Festival २०२३ : चित्रकारानं पर्यावरण बचाव देखावा साकारत गणरायाला घातलं 'हे' साकडं; पाहा व्हिडिओ
- Ganesh Festival 2023: लालबागमधील पर्यावरणाचा राजा पाहण्यासाठी भाविकांच्या लागल्या रांगा, पाहा व्हिडिओ
- Ganesh Festival : एकाच छताखाली 351 गणपतींचे दर्शन; खंडेलवाल कुटुंबाची गणरायावर आगळीवेगळी श्रद्धा