चंद्रपूर - लॉकडाऊनमध्ये कोरडा पडलेला गळा ओला करण्यासाठी तळीराम वाटेल ती किंमत मोजत आहेत. अशा तळीरामांना दारू पुरविण्यासाठी दारूतस्कर पुढे सरसावले आहेत. त्यामुळेच लॉकडाऊनदरम्यान पोलीस आणि दारू तस्कर यांच्यात कारवाई दरम्यान काही वेळा पकडा-पकडी सुरू असल्याचे दिसत आहे. मंगळवारी अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्याची सीमा पार करणाऱ्या दारू तस्करांच्या कारचा पाठलाग करुन गडचांदूर पोलिसांनी 7 लाख 30 हजारांची दारू जप्त केली. दोन आरोपींनादेखील ताब्यात घेतले आहे, तर चालक फरार आहे.
दारू तस्करांच्या कारचा पाठलाग करत पोलिसांनी दारुसाठा केला जप्त; दोघांना अटक हेही वाचा...हिंगोलीत किडे असलेली तूर डाळ लाभार्थ्यांच्या माथी; नागरिक संतप्त
चंद्रपूर हा तसा दारुबंदीचा जिल्हा. मात्र, जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये दारू तस्करीच्या घटना वाढल्याचा घटना समोर येत आहे. लॉकडाऊनमध्ये तर तळीरामांचा दारू उपलब्ध करुन देण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याला तेलंगाणा राज्य आणि यवतमाळ जिल्हाची सीमा आहे. लॉकडाऊन असल्याने या सर्व सीमा बंद आहेत. अशात मंगळवारी कोरपना-यवतमाळ जिल्ह्याची सीमा असलेल्या पैनगंगा सीमेवर जिल्हा पार करणाऱ्या दुचाकीची तपासणी गडचांदूर पोलीस करत होते. त्याच दरम्यान एम. एच. 34 8677 या क्रमांकाची एक कार तिथे आली. मात्र, पोलिसांनी पाहताच कार चालकाने तिथून पळ काढण्यास सुरूवात केली.
या कृत्याची पोलिसांना शंका आली. पोलिसांनी कारचा पाठलाग केला आणि कार पकडली. त्यावेळी कारमध्ये विदेशी दारूच्या सोळा पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी या कारवाईत संपत समय्या चारुपाका, सोनल भानुदास बेलके या दोन आरोपींना अटक केली आहे तर कारचालक राजू करपुरी फरार झाला आहे. आरोपींकडून 7 लाख तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शकील अंसारी, अरविंद तुराणकर यांनी केली.