चंद्रपूर - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर आनंदवनात शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी आमटे कुटुंबातील सर्व सदस्य, शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी, त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.
बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या ठिकाणीे विशेष फॉरेन्सिक पथकाकडून त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे पार्थिव आनंदवनात पाठविण्यात आले. अंत्यत शोकाकूल वातावरणात परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बाबा आमटे, साधना आमटे यांच्या समाधीस्थळाच्या बाजूलाच त्यांचा दफनविधी करण्यात आला.