महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाईलच्या ऑनलाइन पार्सलमध्ये फसवणूक; गरीब विद्यार्थ्याने केली आत्महत्या - chandrapur breaking news

भिसी अप्पर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे हा बारावीचा विद्यार्थी होता. महाविद्यालय बंद असल्याने सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. केवळ शिक्षणासाठी त्याला मोबाईल घ्यायचा होता.

Rohit Rajendra Jambhule
रोहित राजेंद्र जांभुळे

By

Published : Oct 9, 2020, 6:32 PM IST

चंद्रपूर - बारावीत असणाऱ्या गरीब विद्यार्थ्याने कसेबसे पैसे जमवत ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल मागविला. मात्र, पार्सलमध्ये मोबाईलच्या जागी दोन वॉलेट आणि बेल्ट होता. आपली फसवणूक झाल्याचा आघात या विद्यार्थ्याला सहन झाला नाही. आणि त्याने विहिरीत उडी घेऊन आपला जीव दिला. ही घटना चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथे घडली.

रोहीतची आई

भिसी अप्पर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे हा बारावीचा विद्यार्थी होता. महाविद्यालय बंद असल्याने सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. रोहितकडे यापूर्वी असलेला मोबाईल खराब झाला होता. केवळ शिक्षणासाठी त्याला मोबाईल घ्यायचा होता. मात्र, घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची होती.

त्याने 15 हजारांचा मोबाईल ऑनलाइन बुक केला. कसेबसे दहा हजारांची जुळवाजुळव केली. ते पैसे कंपनीला ऑनलाइनच्या माध्यमातून दिले होते व उर्वरित ५ हजार रुपये पोस्टमार्फत पार्सल स्वीकारून पोस्ट विभागाला द्यायचे होते. यासाठी रोहीतला पोस्टातून फोन आला. त्याने पार्सल सोडविण्यासाठी पैसे नसल्याने आईकडे पैशाची मागणी केली. आईने पैशाची जुळवाजुळव करून ती मुलासोबत पोस्टात पार्सल सोडवायला गेली.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठविलेले पार्सल आई व मुलाने उघडून बघितले आणि त्यांना धक्काच बसला. कारण त्या पार्सलमध्ये मोबाईल नव्हता. त्यात दोन पाकिटं आणि एक बेल्ट होता. युवकाला आपली मोबाइल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन केला. परंतु त्या कंपनीचा फोनच लागत नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने १५ हजार रुपयांचा भुरदंंड बसल्याने आईवडील नाराज झाले होते. या गोष्टीचा रोहीतच्या मनावर परिणाम झाला.

काल दुपारी तीन वाजेपासून रोहीत घरातून बाहेर गेला. आई-वडीलांनी नातेवाईक, मित्रपरिवाराकडे विचारपूस केली असता. त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. आज सकाळी गावातील शेतकरी व महिला शेतात जात असताना त्याची गाडी व कपडे विहिरीजवळ दिसल्यामुळे विहिरीत त्याचा शोध घेतला. तर त्याचा मृतदेह विहिरीत सापडला. संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details