चंद्रपूर - जिल्ह्याच्या भद्रावती आणि वरोरा तालुक्यात वाळूतस्करीसाठी कुख्यात असलेल्या वासुदेवला अखेर भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात वासदेवसह सापडलेल्या इतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रशासनाची ही मोठी कारवाई मानल्या जात आहे. तर, यामुळे जिल्ह्यातील वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
वाळूतस्करांचे धाबे दणाणले; कुख्यात वाळूतस्कर वासुदेवसह चार जणांना अटक, दोन ट्रक जप्त - illegal sand smuggling news in chandrapur
भद्रावती आणि वरोरा या तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनन करून तस्करी करणाऱ्या कुख्यात वाळूतस्कराला भद्रावती पोलिसांनी अटकेत घेतले. यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोरोना लॉकडाऊनचा काळ वाळूतस्करांसाठी सुवर्ण काळ ठरला. यादरम्यान वाळूची अव्याहतपणे उत्खनन करून तस्करी केली जायची. जिल्ह्यात सर्वत्र हे सुरू होते. मात्र वरोरा-भद्रावती तालुक्यात वाळूतस्करीचे प्रकरण चांगलेच तापले होते. येथे वासुदेव ठाकरे नामक वाळूतस्कराकडून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन होत होते. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एमआयडीसी, तेलवासा परिसरातून तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे २२५ ब्रास तर वेकोलीच्या नवीन कुनाडा खदान परिसरात १५० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा नेमका कुणाचा यासाठी याचा तपास भद्रावती पोलिसांकडे देण्यात आला होता. तेव्हापासून चौकशी सुरू होती.
पोलीस तपासात ही सर्व वाळू वासुदेव ठाकरे याची असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर, वासुदेव ठाकरे, संतोष चिकराम, किरण साहू व अनिल केडाम यांना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन हायवा ट्रकही जप्त करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात मस्के यांनी केली. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.