चंद्रपूर - जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री आणखी तीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४२ झाली आहे. नवीन तीनही रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह झाले आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील एका ४३ वर्षीय बाधिताची ३३ वर्षीय पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलालाही संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या बाधितांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अन्य एक बाधित ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड किन्ही येथील २२ वर्षाचा युवक असून अड्याळ टेकडी येथील बाधिताच्या संपर्कात आल्याने त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या या युवकाला उशिरा लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.
चंद्रपूरमध्ये आतापर्यंत २ मे (१), १३ मे (१), २० मे (१०), २३ मे (७) व २४ मे (२), २५ मे (१), ३१ मे (१), २ जून (१), ४ जून (२), ५ जून (१), ६ जून (१), ७ जून (११) आणि ९ जून (३) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ४२ झाले आहेत. आतापर्यंत २३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ४२ पैकी अॅक्टिव्ह बाधितांची संख्या आता १९ आहे.