चंद्रपूर -ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीचे सरकार आहे. ओबीसींचे राजकीय नेतृत्व उभे होवू द्यायचे नाही. त्यांना राजकारणात मोठे होवू द्यायचे नाही, असा या सरकारचा उद्देश आहे, अशी टीका भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केली. ओबीसी वर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने भाजपने राज्यभरात राज्यभरात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्या नेतृत्वाखाली वरोरा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले अहीर?
ओबीसी आरक्षण हा आबीसीं बांधवांचा घटनादत्त अधिकार आहे त्यावर गदा येऊ दिली जाणार नाही. केंद्र सरकारला दोष द्यायचा व आपले पाप झाकायचे ही या सरकारची वृत्ती आहे. विशेष मागासवर्ग आयोग स्थापन करून एम्पिरिकल डाटा राज्य सरकारला सादर करायचा असतांना त्याकडे हेतुपूरस्सर दुर्लक्ष केले व वेळेवर हा डाटा सादर केला नाही. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली. आता सरकारने हे आरक्षण पूर्ववत मिळवून द्यावे अन्यथा त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तसेच ओबीसी बांधव यापुढे त्यांना खुर्चीवर बसु देणार नाही, असेही माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर म्हणाले.