चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. सावरकरांना बलात्कार हे राजकीय हत्यार वाटत होते. असा दावा शिवाननी वडेट्टीवार यांनी केला होता. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करत उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे. यावेळी बोलतांना मुनगंटीवार म्हणाले, विनाशकाले विपरीत बुद्धी असा काँग्रेस पक्षाचा उल्लेख करत त्यांनी आता शिवसेनेची यासंदर्भातली काय भूमिका असणार आहे हे आम्ही बघणार आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य :शिवानी वडेट्टीवार या युवक काँग्रेसच्या नेत्या असुन तीन दिवसांपूर्वी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या सन्मानार्थ त्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला संबोधित करताना त्यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजपचे लोक फुले शाहू आंबेडकरांच्या सन्मानार्थ कधीही मोर्चे काढणार नाहीत. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ मोर्चे काढणार. सावरकरांनी म्हटले होते की, बलात्कार हे एक राजकीय शस्त्र आहे. त्याचा उपयोग आपण आपल्या राजकीय विरोधकांवर करू शकतो असे वक्तव्य त्यांनी केले होते. या संदर्भातला व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल झाला होता.
महाविकास आघाडीत फुट :तसेच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. यासंदर्भात शिवसेना, काँग्रेसमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सावरकरांवर कुठलेही वादग्रस्त वक्तव्य करू नये अशी भूमिका सेनेची आहे. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून संपूर्ण राज्यात वज्रमुठ सभा घेण्यात येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत महाविकास आघाडीत पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.