चंद्रपूर - संचारबंदीमध्ये कामगार, मजुरांना रोजगाराची प्रतीक्षा लागली होती. अशातच तेंदूपत्ता संकलनाचे काम आले. मात्र, तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वल, वाघाचे हल्ले झाल्याने दहशत पसरली होती. या मजुरांचा सुरक्षेसाठी आता वनविभाग सरसावला आहे. जंगलात डफ वाजवून फटाके फोडून वन्यजीवांना मजुरांपासून दूर ठेवले जात आहे. वनविभागाचे संरक्षण मिळत असल्याने तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी मजुरांचा ओघ वाढला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनक्षेत्रात 4 युनिट आहेत. या यूनिट अंतर्गत 40 तेंदूपत्ता संकलन केंद्र आहेत. तर, राजुरा वनपरिक्षेत्रात 3 युनिट असून 22 तेंदू संकलन केंद्र आहेत. या यूनिटमधून जवळपास 22 गावातील 25 हजारपेक्षा अधिक लोकांना तेंदूपत्ता संकलनातून रोजगार मिळाला आहे. हे मजूर पहाटेच तेंदूपता तोडण्यासाठी जंगलात जातात. मात्र, या भागात गेल्या काही महिन्यांपासून वाघ, अस्वलाची दहशत आहे. त्यामुळे तेंदुपत्ता तोडणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातारण पसरले होते. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम वाया जाणार या चिंतेत मजूर असताना मजुरांचा संरक्षणासाठी आता वनविभाग सरसावला आहे.