चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे दोन जणांचा बळी घेऊन दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. आज रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बिबट्याला 'डार्ट' मारून बेशुद्ध करण्यात आले.
गडबोरीत दहशत माजविणारा बिबट्या अखेर जेरबंद, दोन जणांचा घेतला होता बळी - चंद्रपूर
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे दोन जणांचा बळी घेऊन दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले.
गडबोरी येथे बिबट्याने चांगलीच दहशत माजविली होती. स्वराज नावाच्या एका नऊ महिन्याच्या मुलाला हा बिबट्या उचलून घेऊन गेला. यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडल्याचा दावा केला होता. मात्र, 6 जूनला बिबट्याने रात्री अंगणात झोपलेल्या गयाबाई हटकर या 65 वर्षीय वृद्धेला ठार केले. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार घटनास्थळी भेट देत नाहीत, तोवर मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका विधानसभा गटनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली.
यावेळी वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन लिखित आश्वासन आणि तत्काळ मदत दिल्यानंतरच अखेर मृतदेह उचलण्यास गावकरी तयार झाले. या दिवसापासून गावात वनविभागाचे जवळपास 50 स्वयंसेवक गावाला पहारा देत होते. तसेच गावकरी देखील गस्त घालीत होते. आज रात्रीच्या सुमारास हा बिबट्या गावाच्या जवळ आढळून आला. यावेळी ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही क्षेत्रातील वनविभागाचे विशेष पथक तसेच पशुवैद्यकीय अधिकारी तिथे उपस्थित होते. ज्या ठिकाणी 9 महिन्याच्या मुलाचा मृतदेह आढळला होता, त्याच ठिकाणी हा बिबट्या होता. त्याला डार्ट मारून गुंगीचे औषध देण्यात आले. या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे.