चंद्रपूर : मागील सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ( Heavy Rain In Chandrapur ) पूरजन्यस्थिती निर्माण झाली असून, यात शेकडो घरे पाण्यात गेले आहेत. तर, 900 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे, सध्या पाऊस थांबला असला तरी, पुरजन्य ( Flood in Chandrapur ) स्थिती कायम असल्याने चिंता देखील कायम आहे.
संततधार पावसाने जनजिवन विस्कळीत -भद्रावती शहरातील पिंडोणी तलाव गुरूवारला रात्री १.३० च्या दरम्यान ओव्हरफ्लो झाला. परिसरातील नागरिकांना पुराचा धोका होवू नये म्हणून नगर परिषदेचे पथक पहाटेच घटनास्थळी दाखल झाले. बल्लारपूर तालुक्यात आतापर्यंत ९२ घरांची पडझड झाली. तालुक्यातील हडस्ती-चारवट, चारवट-माना या दोन गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी कॉलनी कडून बाबापुर_मानोली गावाकडे जाणारा मार्ग पुरामुळे बंद झाला आहे. वर्धा नदीला पूर आल्याने गोवरीवासियांची धडधड पुन्हा वाढली. वेकोलिच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे बॅक वॉटरचा धोका वाढला आहे. जिवती- तेलंगणाकडे जाणारा मुख्य मार्गावरील लोलदोह पुलावरील स्लॅप उखडला. त्यामुळे या मार्गावरील रहदारी पूर्ण बंद झाली आहे. संबंधित विभाग प्रमुखांना सूचना देऊनही त्यांनी अजून पर्यंत या पुलाची पाहणी केलेला नाही. गोसेखुर्द धरणाचे बारा दरवाजे १.५ मीटर ने खुले करण्यात आल्याने वैनगंगा फुगली आहे. त्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव, गंगापूर व टोक या गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटला आहे. पाण्याचा प्रवाह वाढत राहिल्यास या गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जाण्याची शक्यता आहे. सावली तालुक्यातील जिबगाव -उसेगाव, अंतरगाव- नीमगांव; देवटोक - शिर्शी , चारगांव -भारपायली -सावली लोंढोली -चामोर्शी या गावाचा संपर्क तुटला आहे. सुमारे १३० घरांची पडझड झाली आहे. करोली येथील तीन कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थानांतर करण्यात आले. संततधार पावसाने जनजिवन विस्कळीत झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतीत अनेकांनी खत ठेवली होती. पाऊस आला. खत वाचविण्यासाठी बळीराजा डोंग्याच्या मदतीने खत परत आणण्यासाठी धडपड करीत आहे. त्यामूळं जिवघेण्या पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत सूरक्षितस्थळी हलवित आहे.
धानोरकर बल्लारपुरात पुरपिडीतांना भेट -चंद्रपूर ता. बल्लारपूर तालुक्यातील ९२ घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे, घरांचे पंचनामे तात्काळ करा. पुर परिस्थिती बघता शाळांना सुट्टी द्या. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करा. सध्याची बिकट परिस्थिती पाहता विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर ( MP Balu Dhanorkar ) यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. खासदार धानोरकर यांनी बल्लारपूर येथील विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये तालुक्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील पुरग्रस्त भागाला भेटी दिल्या. पुरपिडीतांच्या समस्या एेकून घेतल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार राईचवार, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर देवळीकर, पोलीस निरीक्षक पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम आदींची उपस्थिती होती.