चंद्रपूर - उर्जानगर येथील नागरी वसाहतीत एका पाच वर्षीय चिमुकलीला खेळत असताना बिबट्याने उचलून नेले. बिबट्याच्या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाला आहे. लावण्या दांडेकर असे या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची वसाहत म्हणून उर्जानगरची ओळख आहे. हा परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून जवळच आहे. तसेच या वसाहतीच्या आजूबाजूला काटेरी, झुडपी जंगल आहे. त्यामुळे येथे वाघ, बिबट्या आणि अस्वलासारख्या हिंस्र प्राण्यांचा देखील वावर आहे. खरं तर हे संपूर्ण काटेरी, झुडपी जंगल साफ साफ करायला हवं. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. या परिसरात हिंस्र प्राण्यांचे नेहमी दर्शन होते. आज या समस्येतून हृदयद्रावक घटना घडली.
बिबट्याने पाच वर्षीय चिमुकलीला उचलून नेले; मुलीचा मृत्यू
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची वसाहत म्हणून उर्जानगरची ओळख आहे. हा परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून जवळच आहे. तसेच या वसाहतीच्या आजूबाजूला काटेरी, झुडपी जंगल आहे. त्यामुळे येथे वाघ, बिबट्या आणि अस्वलासारख्या हिंस्र प्राण्यांचा देखील वावर आहे.
सीआयएसएफचे कॉन्स्टेबल उमाशंकर दांडेकर ह्यांची पाच वर्षीय मुलगी लावण्या सायंकाळी पर्यावरण चौकातील एफ टाइप वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर खेळत असताना बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. तेथून तो न्यू एफ टाइप वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पळून गेला. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी घटनास्थळापासून पन्नास ते साठ फूट अंतरावर ही मुलगी गंभीर अवस्थेत आढळून आली. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यावर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काटेरी झुडुपांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
उर्जानगर वसाहतीच्या आजूबाजूला काटेरी झुडुपे तयार झाली असून आता हिंस्र प्राणी त्यात आपला अधिवास शोधू लागले आहेत. ही स्थिती मानव-वन्यजीव संघर्ष वाढविणारी आहे. याबाबत वनविभागाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या व्यवस्थापनाला अनेकदा सूचना दिल्या. मात्र, त्यावर थातुरमातुर काम करण्यात आले. या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.