चंद्रपूर - नवजात बालिकेचे अर्भक चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी या गावात आज (गुरुवारी) सकाळी उघडकीस आली. याची माहिती तात्काळ आशा सेविकेला मिळाल्यामुळे आणि तिच्या प्रसंगावधाने या अर्भकाला वाचविण्यात आले आहे. ही क्रूर माता कोण, हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले की मुलगी आहे म्हणून तिला उघड्यावर टाकून देण्यात आले, याबाबतचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
धक्कादायक : स्त्री जातीचे नवजात अर्भक उघड्यावर फेकले; क्रूर मातेचा शोध सुरू - Brahmpuri taluka
नवजात बालिकेचे अर्भक चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी या गावात उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून त्वरित या नवजात बालिकेला ताब्यात घेवून ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ती सुखरूप आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात मेंडकी हे एक छोटेसे गाव आहे. येथील बस थांब्यापासून काही अंतरावर माळी मोहल्यामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर एक खुली जागा आहे. याच जागेवर कचरा फेकला जातो. येथे एका नवजात बालिकेचे अर्भक कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले. सकाळी पाच वाजताच्या सुमारास एक महिला या ठिकाणी शौचास आली असता तिला लहान बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याठिकाणी जाऊन बघताच तिला मोठा धक्का बसला. याची माहिती मेंडकी पोलिसांना देण्यात आली. तसेच तिथे स्थानिक आशा सेविका देखील पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून त्वरित या नवजात बालिकेला ताब्यात घेवून ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ती सुखरूप आहे. मात्र पोटच्या मुलीला कचऱ्यात फेकून देणारी ही क्रूर माता कोण, याचा शोध महत्त्वाचा आहे. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मले आहे की केवळ मुलगी झाली म्हणून तिला असे बेवारस फेकून देण्यात आले, याबाबतचा तपास पोलीस करित आहे.