चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पोटात दुखत असल्याने पालकांनी तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सदर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. पोलीस तपासात मुलीच्या मैत्रिणीच्या बापानेच हे सैतानी कृत्य केल्याचे उघड झाले आहे. याबाबत शेगाव पोलिसांनी शनिवारी आरोपी योगेश दोहतरे (४०) याला अटक केली.
हेही वाचा...अनर्थ टळला..! गडचिरोली पोलिसांनी उधळला नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट
प्राप्त माहितीनुसार, १२ वर्षीय पीडित मुलगी अभ्यास करण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडे म्हणजे आरोपीच्या घरी येत असे, आरोपीने याचा फायदा घेत सदर मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबद्दल कोणाला सांगितले, तर जीवे मारुन टाकण्याची धमकी देखील आरोपीकडून देण्यात आली होती. त्यामुळे घाबरलेली पीडिता अन्याय सहन करत होती. आणि तिच्या भीतीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
हेही वाचा...'कोरोना' संदर्भात अफवा पसरवणे पडले महागात, पुण्यात एकावर गुन्हा दाखल
यानंतर शुक्रवारी पीडित मुलीचे पोट दुखू लागल्याने तिच्या आईने तिला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यावेळी पीडितेची तपासणी केली असता, अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समजले. हा प्रकार लैंगिक अत्याचाराचा असल्याने चिमूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस चौकशीचा ससेमिरा आणी बदनामी टाळण्याकरीता मुलीच्या आईने मुलीला सोबत घेऊन तेथून पळ काढला. चिमूर पोलीस उपजिल्हा रुग्णालयात पोहचल्यानंतर त्यांनी पीडित मुलगी व आईचा पत्ता शोधला. तसेच हे प्रकरण शेगाव पोलिसांकडे वर्ग केले.
यानंतर शनिवारी शेगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी योगेश दोहतरे या नराधमाविरोधात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेप्रकरणी आरोपीला तातडीने शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.