चंद्रपूर (राजुरा) -दहा जणांचा बळी घेणारा वाघ अद्यापही वनविभाग जेरबंद करू शकलेला नाही. वाघ सतत वनविभागाला हुलकावणी देत आहे. पकडणे शक्य नसल्यास या वाघाला ठार मारा, अशी मागणी शेतकऱ्यांंनी केली आहे. तसेच यासंर्दभात शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना ई-मेल केला आहे. दुसरीकडे, वाघाला तत्काळ जेरबंद न केल्यास सोमवारी रास्तारोको करू, असा इशारा शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने दिला आहे.
राजुरा, विरुर तसेच लगतच्या लाठी भागात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या वाघाला पकडण्यात वनविभागाला अपयश आले आहे. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांना जीविताची हमी देण्यासाठी या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्या वाघाला ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे. राळेगाव - पांढरकवडा आणि ब्रह्मपुरी या भागात यापूर्वी परवानगी देऊन वाघाला ठार मारण्यात आले होते.