महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर शेतकरी तुरुंगात जायला तयार; तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलनात ॲड. वामनराव चटप यांची घोषणा

प्रतिबंधित बियाण्याची लागवड केली म्हणून शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केल्यास शेतकरी तुरुंगात जायला तयार आहेत, असे ॲड.वामनराव चटप यांनी म्हटले आहे.

Shetkari Sanghtana agitation
शेतकरी संघटनेचे आंदोलन

By

Published : Jun 13, 2020, 11:25 AM IST

चंद्रपूर-राज्य सरकारने तातडीने कृषी विद्यापीठामार्फत जीएम बियाण्याची चाचणी सुरू करावी. केंद्र सरकारने या सुधारित बियाण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. प्रतिबंधित बियाण्याची लागवड केली म्हणून शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केल्यास शेतकरी तुरुंगात जायला तयार आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलनात केली.

शेतकरी संघटनेतर्फे राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे प्रतिबंधित असलेल्या सुधारित जनुक कापसाच्या बियाण्यांची जाहीरपणे पेरणी करण्यात आली. शेतकरी बबन रणदिवे यांच्या शेतात ही पेरणी झाली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी " शरद जोशी जिंदाबाद " , " शेतकरी संघटनेचा विजय असो ",अशा घोषणा दिल्या.

शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन

शेतकर्‍यांना सर्व प्रकारचे उपलब्ध तंत्रज्ञान वापरण्याची मुभा असावी. जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करता यावी, पिकाचा उत्पादन खर्च कमी व्हावा,शेतकऱ्याचे व पर्यायाने देशाचे उत्पन्न वाढावे, ही शेतकरी संघटनेची जुनीच मागणी आहे. शेतकरी संघटनेने जीएम बियाणे वापरण्यावरील बंदी उठवावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी व पर्यावरण मंत्री महोदयांकडे मागणी केली आहे.

सरकार मात्र ही बंदी उठवायचा निर्णय घ्यायला तयार नाही. अखेर या मागणीसाठी यावर्षी पुन्हा प्रतिबंधित बियाणे पेरुन सविनय कायदेभंग करण्याची घोषणा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते चटप यांनी केली होती. यावर्षी शेतकरी संघटना हा खरीप हंगाम तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम म्हणून साजरा करीत आहे. प्रतिबंध असलेल्या कापसाच्या बियाण्याची पेरणी करण्याचा निर्णय घेऊन त्याला आंदोलनाचे स्वरूप दिले गेले.

या पेरणीच्या कायदेभंग आंदोलनात शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती सभापती कवडु पाटील पोटे, माजी सभापती प्रभाकर ढवस, हरिदास बोरकुटे, शेषराव बोन्डे, दिलीप देठे, नानाजी पोटे, मारोती लोहे, कपिल ईदे, मधुकर चिंचोलकर, आबाजी धानोरकर,नारायण आदे, मुरलीधर किन्नाके, विलास बोबडे,देविदास पडोळे, रामदास कोहपरे,बंडू डोंगे, रवींद्र बोबड, महिला आघाडीच्या वंदना जुमनाके, माया देठे, अनिता कोटनाके यांचेसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details