चंद्रपूर - कोरोना विषाणूने धावणारे जग थांबले. देशात लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये उद्योग धंदे ठप्प पडले आहेत. अशात गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील एका शेतकऱ्याने मत्स्यपालनातून आपली शेती फुलविली. आपल्या सव्वादोन एकर शेतीत असलेल्या तीन मच्छीखड्यातून गेल्या महिनाभरात तब्बल तीन लाख रूपयांची मच्छीविक्री केली. कोरोनाचे खापर कोंबडीवर फुटल्याने मासोळ्यांना बाजारात मोठी मागणी आहे. याचा फायदा शेतकऱ्याला झाला. सकमूर गावातील अशोक रेचनकर या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा हा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील अशोक रेचनकर यांची गुजरी गावालगत पंधरा एकर शेती आहे. पूर्वी ते या शेतात पारंपारिक पीक घेत होते. पण शेताच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करण्याचे त्यांनी नियोजन केले. मागील वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात पंधरा एकर शेतीपैकी सव्वा दोन एकर शेतात त्यांनी तीन मच्छीखड्डे तयार केले. मोटारपंपाच्या साहाय्याने नदीतील पाणी मच्छीखड्यात सोडण्यात आले. यानंतर छत्तीसगड व कलकत्ता येथून झरण व छिलटेवाली अशा एकूण 40,000 मत्सबिजाई टाकण्यात आली. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात हे मासे पाऊन-एक किलो वजनाचे झाले. ऐन विक्रीसाठी मासे तयार होत असताना कोरोनाचे सावट आले. या संकटकाळाशी मुकाबला करण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला अन् सारंच थांबलं.