चिमूर( चंद्रपूर) - बामनगाव येथील एक दाम्पत्य शेताला कुंपण करण्यासाठी दुपारच्या वेळी शेतात गेले होते. यावेळी वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. राज्यपाल दयाराम नागोसे (वय ३५) असे हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
परिसरात रोहणी नक्षत्राचा पाऊस पडल्याने शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. शेतातील पिक जंगली जनावरांनी खावू नये म्हणून कुंपण करण्यासाठी शेतकरी आणि त्याची पत्नी दोघेही शेतात गेले होते. मात्र, शेतकरी झाडाच्या फांद्या तोडत असतानाच शेतात दबा धरुन बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार झाला.