चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील शेतात रोज रात्री वेगवेगळ्या प्राण्यांचे भयावह आवाज घुमत असतात. हा काय प्रकार आहे, याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली होती. आता हा आवाज आपल्याही शेतात घुमावा यासाठी अनेक शेतकरी प्रयत्नशील आहेत. विहीरगाव येथील भुषण खोत या शेतकऱ्यांने वन्यजीवांना दूर ठेवण्यासाठी चक्क शेतातच भोंगे लावलेत. रोज रात्री या भोंग्यातून भयावह आवाज गुंजत असतो.
'त्या' शेतकऱ्याच्या शेतातून रात्री येतात गुढ आवाज वन्यजीवांच्या त्रासाला आवर घालण्यासाठी या शेतकऱ्याने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. केवळ अडीच हजार रूपये खर्च करून त्याने शोधलेल्या कल्पनेमुळे वन्यजीव शेतातून दूर पळू लागले आहेत. शेती करताना शेतकरी बांधवांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पाणी, पाऊस चांगला आला अन् निसर्गानेही साथ दिली तरी शेतातील पिकावर वन्यजीवांकडून होणारे नुकसान हा अतिशय गंभीर प्रश्न आवासून उभा राहतो. अशावेळी वन्यजीवांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतात. काही शेतकरी नाईलाजाने विद्युत प्रवाह, थायमीठ आणि इतर पर्यायाचा वापर करतात. यामुळे कधी वन्यजीवांचा तर कधी मानवांचाही बळी गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
हेही वाचा -भागो... भागो...शेर आया...! चंद्रपुरात मानवी वस्तीत पट्टेरी वाघाचे दर्शन
मुळचा नागपूरचा व सध्या गोंडपिपरीत स्थिरावलेला भुषण खोत विहीरगाव येथे गेल्या दोन वर्षांपासून आठ एकर शेती करत आहे. मागील वर्षी पहिल्यांदा त्याने शेतीची कास हातात घेतली. निसर्गान साथ दिली आणि चांगले उत्पन्न होणार अशा स्थितीत पीक असताना वन्यजींवांनी त्याच्या शेतीची प्रचंड नासधूस केली. यात त्याचे मोठे नुकसान झाले. पण हार न मानता त्याने यंदाही शेती केली. धानाचा हंगाम संपल्यानंतर आता भुषणने आपल्या आठ एकर शेतात हरभरा आणि गहू लावला आहे. मागील वर्षी वन्यजींवाकडून पिकांचे झालेल्या नुकसानीने तो व्यथीत होता. अशात त्याने वन्यप्राणी आपल्या शेतात येऊ नये, यासाठी एक कल्पना शोधली.
हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: आता लखमापूर गावही पांघरणार उजेड, गावातच होईल मोबाईल चार्ज
त्याने एक एम्लीमीटर घेतला आणि साधारणत: दहा साउंडचे भोंगे घेतले. ते भोंगे त्याने शेतीच्या बांधावर लावले. आपल्या शेतातील मिटरवरून विद्युत प्रवाहाने एम्लीमीटर व भोंग्यांना एकमेकांना जोडले. यांनतर माणसांचा, कुत्र्यांचा, फटाक्यांचे अशा भयावह आवाजाचे रेकार्डींग केले. हे सगळे आवाज रोज रात्री त्याच्या शेतात असे विविध आवाज घुमतात. या आवाजाने जेव्हापासून हे सिस्टीम त्याने शेतात लावले तेव्हापासून एकही वन्यजीव भटकला नाही. शेतातून येणारे आवाज ऐकून अनेक जण चकित अन भयभीतही झाले. वन्यजीव हाकलण्याचा हा प्रयोग असल्याचे नंतर लक्षात आले.
वन्यजीवांपासून पिकांचे सरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करण्यासोबतच रात्रंरात्र शेताची राखण करण्यासाठी जागतात. तरी देखिल रानडूक्कर, वाघ, हरिण यासारखे वन्यजीव शेतात येतातच. विशेषत: रानडुक्कर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. यावर भुषणने शोधलेला उपाय कमालीचा यशश्वी ठरला आहे. रात्री वन्यजीवांसाठी तर सायंकाळी पशुंपासून पिकांची सुरक्षा करण्यासाठी हा प्रकार कमाल करणारा ठरला आहे. या पासून वन्यजीव शेतात येत नसल्याने त्यांच्या सुरक्षेसोबतच पिकांचीही सुरक्षा होत आहे.
अडीच हजार रूपयात कमाल
भुषणने केलेल्या या प्रयोगाकरता फक्त अडीच हजार रूपये खर्च येतो. एक एम्लीमीटर शेतीनुसार साउंडचे भोंगे, एक मेमोरी कार्ड आणि विद्युत प्रवाह एवढे साहित्य लागते. यातून शारिरीक व मानसिक त्रासासोबत वन्यजीव रक्षणही होत आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनाही फायदा
भुषणने आपल्या आठ एकर शेतात आवाजाचा हा प्रयोग राबवित आहे. यातून येणाऱ्या आवाजाने आजुबाजुंच्या शेतातही वन्यजीवांनी जाणे टाळले आहे. यामुळे भुषणसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे. वनविभागाने जागृती करावी. गोंडपिपरी तालुक्यात गेल्या चार महिन्यात शेतात एक वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. तर चेकबोरगावजवळ विद्युत प्रवाहाने दोन रान गव्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यांनतर मानव वन्यजीव संघर्ष पेटला. अशावेळी जर भुषणच्या या प्रयोगाचा वनविभागाने जागृती केली तर वन्यजीवांचे सरंक्षणासोबत मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास मोठी मदत होईल.