चंद्रपूर- लॉकडाऊनच्या काळात कर्जाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. आपल्या घरी गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सुरेश ठमके असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
राजुरा तालुक्यातील चनाखा या गावातील 55 वर्षीय सुरेश ठमके या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी घराच्या आडोशाला असलेल्या स्नानगृहात त्यांनी गळफास घेतला. प्राथमिक चौकशीत त्यांच्यावर विविध बँकेचे कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे. शेतीचा पुढील हंगाम कसा करायचा अशा विवंचनेत असताना त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांची पीककर्जासाठी अडवणूक करू नये, असे निर्देश दिले असताना अनेक बँका त्याला हरताळ फासत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.