चंद्रपूर- राजुरा येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याने राज्यभर खळबळ उडाली. याप्रकरणी काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेत असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला.
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे
राजुरा येथील आदिवासी वसतिगृहातील चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. हे वसतिगृह ज्या संस्थेच्या अंतर्गत येते त्याचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आहेत.
याबाबत आज काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे विधानमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार, लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर, विनोद दत्तात्रेय, प्रकाश देवतळे उपस्थित होते.
या प्रकारणात काही लोकं राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणात संस्थेचा अध्यक्ष म्हणून तपासात प्रशासनाला मी पूर्ण सहकार्य करत आहे. ज्या पाच आरोपींना यात अटक करण्यात आली, त्यांना आम्ही तत्काळ बडतर्फ केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्यावर संस्थेकडून चौकशीसुद्धा सुरू केली आहे. असे असताना या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रकार होत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पीडितांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जाते असे सांगितले. त्यामुळेच काही पालक यासाठी तक्रारी करत आहे, असे बेजबाबदार वक्तव्य देखील धोटे यांनी यावेळी केले. विजय वडेट्टीवार यांनी देखील याचे समर्थन केले.
. . . . आणि धोटे बिथरले
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत काही लोकं याचा राजकीय फायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे 17 एप्रिलला काँग्रेसचे माजी खासदारांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. याबाबत त्यानी संस्थाचालकांवरच प्रश्न उपस्थित केले होते. काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे, का असा प्रश्न विचारताच धोटे बिथरले. हे निवडक लोकं कोण असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी देखील याबाबत पुगलियांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.