महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 26, 2021, 4:54 PM IST

ETV Bharat / state

कठोर कारवाईनंतरही चंद्रपुरात प्रतिबंधित तंबाखूला लगाम लागेना! 9 वर्षांत साडेतीन कोटींचा माल जप्त

खर्रासाठी लागणारी तंबाखू, सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याची सर्रासपणे विक्री होताना दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने यावर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि सक्रीय असलेले मोठे रॅकेट यामुळे अजूनही हा अवैध व्यवसाय जोमाने सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

कठोर कारवाईनंतरही चंद्रपुरात प्रतिबंधित तंबाखूला लगाम लागेना!
कठोर कारवाईनंतरही चंद्रपुरात प्रतिबंधित तंबाखूला लगाम लागेना!

चंद्रपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या नऊ वर्षांत चंद्रपूरमध्ये केलेल्या 1687 कारवायांमध्ये तब्बल साडेतीन कोटींचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मात्र, तरिही जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचा सुकाळ दिसून येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे येथे प्रचलित असणाऱ्या खर्रासाठी लागणारी तंबाखू, सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याची सर्रासपणे विक्री होताना दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने यावर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि सक्रीय असलेले मोठे रॅकेट यामुळे अजूनही हा अवैध व्यवसाय जोमाने सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

कठोर कारवाईनंतरही चंद्रपुरात प्रतिबंधित तंबाखूला लगाम लागेना!

बंदी असूनही सर्रास विक्री!

19 जुलै 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाने महत्वाचा निर्णय घेत राज्यात सुगंधी तंबाखू आणि गुटखा विक्रीवर निर्बंध लावले. 2018 मध्ये गुटखा विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी गुटखा आणि सुगंधित तंबाखू सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र बघायला मिळते. चंद्रपूर जिल्हाही यापेक्षा वेगळा नाही. चंद्रपुरात अनेक जण खर्राचे सेवन करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी खर्राची विक्री केली जाते. यात असलेली मागणी आणि नफा बघून अनेकांनी खर्रा विकण्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. ह्या संपूर्ण व्यवसायाची केवळ एक दिवसाची उलाढाल ही कोटींच्या घरात आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा समावेश असूनही अनेक ठिकाणी सर्रासपणे याची विक्री होते. त्यामुळे या अवैध व्यवसायाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याची कल्पना करण्यासारखी आहे.

नव्या अधिकाऱ्यांनी सुधारली विभागाची प्रतिमा
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध विक्रीविरोधात कारवाई केली जाते. मात्र विभागालाही अपुऱ्या मनुष्यबळासह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चंद्रपुरात सहायक आयुक्त म्हणून नितीन मोहिते रुजू झाल्यानंतर त्यांनी याविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला. अन्न सुरक्षा अधिकारी सोनटक्के आणि सातकर यांच्यासह इतरही कर्मचाऱ्यांची साथ त्यांना लाभली. त्यामुळे केवळ तीनच वर्षांत अवैध सुगंधित तंबाखूविरोधात मोठ्या कारवाया करण्यात आल्या. मागील नऊ वर्षांतील एकूण जप्त केलेल्या साडेतीन कोटींच्या सुगंधित तंबाखूत मागील तीन वर्षांची कामगिरीच जवळपास दोन कोटींच्या घरात आहे.

मागील नऊ वर्षांत झालेल्या कारवाया
2012-13 मध्ये 3 लाख 80 हजारांची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. याच प्रमाणे 2013-14 मध्ये 20 लाख 48 हजार, 2014-15मध्ये 8 लाख 33 हजार, 2015-16 मध्ये 19 लाख 12 हजार, 2016-17 मध्ये 2 लाख 74 हजार, 2017-18 मध्ये 27 लाख 21 हजार, 2018-19 मध्ये 39 लाख 32 हजार, 2019-20 मध्ये 42 लाख 75 हजार तर 2020-21 मध्ये 94 लाखांची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली.

जिल्ह्यात सक्रीय असलेले सुगंधी तंबाखूचे रॅकेट
ही तंबाखू मुख्यतः केंद्रशासित प्रदेशातून येते. तिथे कर कमी असल्याने तेथून येणाऱ्या मालातून मोठा नफा मिळतो. गुजरातमधूनही हा माल येत असतो. यासाठी जिल्ह्यात सुगंधी तंबाखूचे एक मोठे रॅकेट सक्रीय आहे. जिल्ह्यात
अशा तस्करांचा सुळसुळाट आहे. या सर्वांनी आपापला परिसर वाटून घेतला आहे. घुग्गूस, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यात एक रॅकेट सक्रीय आहे. तर राजुरा, कोरपना, गोंडपीपरी, पोंभुर्णा या तालुक्यात दुसरे आणि नागभीड, ब्रम्हपुरी, चिमूर येथे तिसरे रॅकेट सक्रीय आहे. ह्या रॅकेटला अनेक बड्या हस्तींचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच वरीष्ठ पातळीवर याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details