महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट! अखेर आयपीएल सट्टा लावणाऱ्यांवर 'एलसीबी'ची कारवाई - LCB take action against IPL bettors

आयपीएल जुगार जोमात सुरू आहे. गडचिरोली पोलिसांनी ह्याचा पर्दाफाश केला. मात्र, चंद्रपूर पोलिसांनी याविरोधात अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, अशा आशयाची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली आहे. बातमी प्रकाशित होण्याच्या दुसऱ्याच दिवशी चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने यावर कारवाई करत चार आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट! अखेर आयपीएल सट्टा लावणाऱ्यांवर एलसीबीची कारवाई
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट! अखेर आयपीएल सट्टा लावणाऱ्यांवर एलसीबीची कारवाई

By

Published : Sep 28, 2021, 12:52 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात आयपीएल जुगार जोमात सुरू आहे. गडचिरोली पोलिसांनी ह्याचा पर्दाफाश केला. मात्र, चंद्रपूर पोलिसांनी याविरोधात अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, अशा आशयाची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली आहे. बातमी प्रकाशित होण्याच्या दुसऱ्याच दिवशी चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने यावर कारवाई करत चार आरोपीला पकडले. मात्र, आयपीएल जुगारात बरेचजण सक्रिय आहेत. अशा मोठ्या माशांवर पोलीस प्रशासन कारवाई करेल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीलच्या जाळ्याची मुख्य सूत्रे नागपुरात

चंद्रपूर आणि इतर लगतच्या जिल्ह्यात क्रिकेटवर सट्टा खेळवण्याचे एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. हे जाळे चंद्रपूरसह गडचिरोली, यवतमाळ, वर्धा येथे पसरले असून याची मुख्य सूत्रे ही नागपुरातुन हलवण्यात येतात. (betx. co, nice.777.net)अशा प्रकारची अनेक बेकायदेशीर वेबसाईट तयार करण्यात येतात ज्याला कुठलीही मान्यता नाही. अशा बेकायदेशिर ऑनलाइन सट्टा प्लॅटफार्मचे युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून एजंट / क्लायंट तयार केले जातात. याच माध्यमातून दररोज कोटींचा जुगार खेळल्या जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आयपीएल सट्टाबाजाराचे रॅकेट गडचिरोली पोलिसांनी समोर आणले. गडचिरोलीतील काही आरोपींना पकडण्यात आले आणि हे बिंग फुटले.

काही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवला आहे

यामध्ये बऱ्याच धनदांडग्यांवर कारवाई करत त्यांच्या मुसक्या गडचिरोली पोलिसांनी आवळल्या आहेत. यातील काहींना अटकही करण्यात आली आहे. तर, काही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवला आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात गडचिरोली पोलिसांनी चंद्रपूर येथील राकेश कोंडावार, रजीक अब्दुल खान, महेश अल्लेवार यांना अटक केली आहे.

धरपकड करण्यात आली

इम्रान पठाण (आलापल्ली), राकेश जेल्लेवार (आलापल्ली), रामू अग्रवाल (नागपूर), अंकित हुमने (नागपूर), मनीष तलवानी (नागपूर), वाजीद भाई (तेलंगणा), महेश (सिरोंचा), गणेश (सिरोंचा), संदीप (सिरोंचा), अविनाश (चंद्रपूर), सुधाकर श्रीरामे (चंद्रपूर), महेश सुगत (चंद्रपूर), विशाल पंजाबी (चंद्रपूर), प्रदीप गोगुलवार (चंद्रपूर), राकेश वाघमारे (चंद्रपूर), विजय आहुजा (चंद्रपूर), संपत (चंद्रपूर) ह्यांची धरपकड करण्यात आली. अजूनही ह्याचा कसून तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. असे, असताना चंद्रपूर पोलिसांनी मात्र, ह्या पार्श्वभूमीवर कुठलीच कारवाई केली नाही.

ईटीव्ही भारतच्या बातमीने कारवाईचा बडगा

इतर जिल्ह्यातील पोलीस येऊन चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपींना पकडून घेऊन जातात ही बाब स्थानिक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. या आशयाची बातमी ईटीव्ही भारतने रविवारी (26 सप्टेंबर)ला प्रकाशित केली. अजूनही 'जिल्ह्यात आयपीएलचे मोठे रॅकेट सक्रिय असून त्यावर कारवाई केलेली नाही'. या मथळ्याखाली ही बातमी प्रकाशित होताच पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आयपीएल सट्टा चालणाऱ्या ठिकाणी कारवाई करत चौघांना अटक केली. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे ही धडक कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये, नविष देवराव नरड (शेगाव), सुरज शंकर बावणे (शेगाव), नितीन तात्याजी उईके (गुंजाळा) आणि हरिदास कृष्णा रामटेके (खानगाव-चिमूर) ह्यांचा समावेश आहे. टीव्ही, मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि नगदी रक्कम असा 74 हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.

...तर बड्या माशांवर कारवाई होईल काय

ईटीव्हीवर बातमी प्रकाशित होताच पोलिसांनी कारवाई सुरू केली. मात्र, जितके मोठे रॅकेट सक्रिय आहे त्यामानाने पकडण्यात आलेले आरोपी क्षुल्लक आहेत. एका दिवसाची जिल्ह्यातील उलाढाल ही कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ह्या रॅकेटच्या व्यापकतेचा अंदाज येऊ शकतो.
प्रत्यक्षात येथे अनेक मोठी नावे सक्रिय आहेत. त्यामुळे अशा मोहिमेत बड्या माशांवर कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही आहेत बडी नावे

या क्षेत्रात सक्रिय असलेल्या काही विश्वसनीय सूत्रांनुसार चंद्रपुर शहरात आशिष, आसिफ, राजीक, नीरज, धीरज, अविनाश ह्यांच्या नावांची चलती आहे. तर, भद्रावतीमध्ये अरविंद आणि राजुरामध्ये भगत ह्या व्यक्तींची नावे ह्यात समोर येत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी यातील काही लोकांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. असे असतानाही लोकं चंद्रपुरात सट्टा सुरू कसा काय ठेवत आहे. ही बाब स्थानिक पोलीस प्रशासनाबाबब प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. एवढेच नव्हे तर शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथूनही चंद्रपुरात अनेक सूत्रे हलवली जातात. मात्र, ईटीव्ही भारतने बातमी देताच पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. पुढे अशा बड्या नावांविरोधात कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details