चिमूर (चंद्रपूर) -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात 'लॉक डाऊन' घोषित करण्यात आले. यामुळे सर्वसामान्यांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब, मोलमजुरी करून जगणाऱ्यांना बसला असून त्यांच्या पोटा-पाण्याचे वांदे झाले आहे. अशांना मदत करण्यासाठी चिमूर युवा संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.
गरजू व गरिबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप - कोरोनाचा वाढता धोका
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात 'लॉक डाऊन' घोषित केले. याचा गरीब, मोलमजुरी करून जगणाऱ्या आणि हातावरचे पोट असणाऱ्या बांधवांना मोठा फटका बसला. त्यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला आहे.

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर 'शट डाऊन' झाल्यानंतर हातावरचे पोट असणाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. निवडणूक काळात महिला मेळावे घेऊन साड्या, मिक्सर, इतर गृहोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते. मात्र, सध्याच्या काळात त्यांच्याकडे कोणी फिरकत नसल्याचे चित्र आहे. मोठ-मोठी आश्वासने देणारे सध्या स्वतः च्या जिवाच्या भीतीने चार भिंतीआड लपले असल्याची स्थिती आहे. मात्र, या काळात गोरगरीब, मजूर, विधवा यांना दोन वेळचे जेवण मिळण्याची आवश्यकता आहे.
येथील विजय गोठे यांच्या मदतीने इंदिरा नगरमधील गरजू व गरीब कुटुंबे आणि व्यक्तींची माहिती घेण्यात आली. या सर्वांना कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात सर्वांनी शासन-प्रशासनाच्या निर्देशांनुसार नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले.