चंद्रपूर -जलप्रदूषणामुळे मृत होणारी तलावे ही आता जागतिक समस्या बनली आहे. ( Eichornia plants are now a global problem) या प्रदूषणातून इकोर्निया नावाची वनस्पती (water plants Eichornia) तयार होते ज्याने संपूर्ण तलावच मृतप्राय होऊन जातो. विशेष म्हणजे जगातील सर्वात वेगाने वाढणारी ही वनस्पती आहे. त्यामुळे या इकोर्नियाचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न आता सर्वांसमोर उभा ठाकला आहे. यावर 'राजुरा पॅटर्न'मुळे एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. (Rajura pattern of freeing polluted lake ekornia) कारण या इकोर्नियाचा उपयोग करून लोकोपयोगी वस्तू तयार करण्याचा उपक्रम राजुरा नगरपालिकेने हाती घेतला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून स्थानिक महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. यातून इकोर्नियाची विल्हेवाट लावण्यास तर मदत होणार आहे, सोबतच स्थानिक रोजगार निर्मितीसाठी मोठी चालना मिळणार आहे.
राजुरा नगर परिषदेसमोरील जुने मामातलाव संपूर्ण इकॉर्निया वनस्पतीने झाकलेले आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर अवकळा आलेली आहे. मात्र याच उपद्रवी वनस्पतीपासून सुंदर हस्तशिल्प बनविण्याचे प्रशिक्षण राजुरा नगरपरिषद महिला बचत गटांना देत आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग राजुरा नगर परिषदेने हाती घेतलेला आहे. नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या पुढाकाराने टाकाऊपासून पर्यावरण पूरक वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण केंद्र सर्वांचे आकर्षण ठरलेले आहे. नगरपरिषद राजुरा व अजय बहुदेशिय संस्था भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मागील दोन आठवड्यापासून क्रीडा संकुल येथे महिला बचत गटातील सदस्य मुख्य प्रशिक्षक स्वाती धोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे गिरवीत आहेत व महिला अतिशय सुंदर वस्तू तयार करीत आहेत. मागील बऱ्याच महिन्यापासून या तलावात जलकुंभी इकोर्निया वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणत झाली आहे. यामुळें पाण्याच्या प्रदूषणात वाढ होऊन तलावाचे नैसर्गिक सोंदर्य नष्ट होते आहे. मात्र नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी पुढाकार घेऊन अजय बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून येथील इकोर्निया वनस्पतीपासून हस्तशिल्प निर्मिती प्रशिक्षण सुरू केले आहे.