चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कामाला जात असताना वाघाने पळवल्याची चर्चा सुरू आहे. भोजराज मेश्राम, असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो कुणाल एंटरप्राइजेस या कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता. ही घटना बुधवारी ( दि. 16 फेब्रुवारी ) रात्री साडे दहाच्या सुमारास समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात वाघाचे दर्शन होत होते. कामावर ये-जा करताना या वाघाशी अनेकांचा सामना झाला आहे. या वाघाच्या मुक्तसंचारामुळे येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वी हा वाघ राष्ट्रवादी काँग्रेसनगरच्या नागरी वस्तीत मुक्तसंचार करताना आढळला होता.
बुधवारी (दि. 16 फेब्रुवारी) कुणाल एंटरप्राइज येथील कामगार भोजराज मेश्राम यांची सायकल व कामावरील हेल्मेट रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत दिसले आहे. सायकलीवर रक्ताचे डाग असल्याने वाघाने पळवल्याची शक्यता स्थानिकांकडून भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता योगेश सपाटे यांच्याशी संपर्क केला असता रात्री उशीरापर्यंत त्यांनी या घटनेची पुष्टी केली नसून बेपत्ता कामगाराचा शोध संबंधित यंत्रणा घेत असल्याची माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. मात्र, ही घटना वाघाच्या हल्ल्यात झाली असल्याची दाट शक्यता वर्तविन्यात येत आहे.
हेही वाचा -Professor Chetan Solanki : पर्यावरण संवर्धनासाठी प्राध्यापक करणार 11 वर्षे देशभर जनजागृती