चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात उफाळून आलेल्या वादाची शाई वाळते न वाळते तोच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वाद पुन्हा समोर आला आहे. राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसद्वारा ईदमिलननिमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रामू तिवारी आणि अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांचे काही केल्या मनोमिलन होताना दिसत नाही आहे. विशेष म्हणजे या दोघांनी आपापल्या आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत एकमेकांची नावे वगळली आहेत.
काँग्रेसच्या अंतर्गत वादांची परंपरा: कुठलाही राजकिय पक्ष किंवा संघटना ही वादातीत नसते. प्रत्येक राजकीय पक्ष, संघटनेमध्ये वाद हा असतो. त्यामुळे हेवेदावे महत्वाकांक्षा, कुरघोडी, डावपेच ह्या सगळ्या गोष्टी यात आल्या. मात्र, त्याचे जाहीर प्रकटीकरण केल्यास प्रतिस्पर्ध्याला त्याचा लाभ होतो. तसेच संघटनही कमजोर होते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पक्षाअंतर्गतच ठेवल्या जातात. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष समजला जाणाऱ्या भारतीय जनता पक्ष देखीव याला अपवाद नाही. मुनगंटीवार आणि अहिर यांच्यातील टोकाचे मतभेद हे सर्वश्रुत आहेत.
राजकीय चर्चा सुरू: भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील कमालीचे वाद आहेत. मात्र, यावर हे नेते कधीही जाहीर भाष्य करीत नाहीत. मात्र काँग्रेस याला अपवाद आहे. येथील नेते पक्षाची प्रतिष्ठा दावणीला बांधत हमरीतुमरीवर येतात. एकमेकांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतात. पुर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलीया आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात आलेले कमालीचे वितुष्ट हे सर्वश्रुत होते. वडेट्टीवारांची काँग्रेस आणि पुगलीया यांची काँग्रेस अशी स्पष्ट विभागणी जिल्ह्याच्या राजकारणात होती. याच राजकीय वैमानस्याचे पुढचे पाऊल हे खासदार बाळू धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात आलेले वितुष्ट होते का? यावर देखील राजकीय चर्चा होऊ लागली आहे.
काँग्रेसच वरचढ ठरली: यापूर्वी त्यांच्यातली धुसफूस अधूनमधून दिसून येत होती. मात्र नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत याचा भडका उडाला. वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट अशी विभागणी झाली. धानोरकरांचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरोरा, भद्रावतीत देखील धानोरकरांच्या पॅनलला एकहाती सत्ता मिळु शकली नसली तरी, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये काँग्रेसच वरचढ ठरली. मात्र वादाचे कारण ठरले ते चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती. येथे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हातमिळवणी करीत पॅनल लढवले आणि जिंकून देखील आले. तर विरोधी पॅनलचे नेतृत्व हे खासदार बाळू धानोरकर यांच्याकडून याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे करीत होते.
वडेट्टीवारांविरोधात तोफ डागली: या विजयाचा जल्लोष करण्यासाठी खुद्द देवतळे आणि भोंगळे तिथे पोचले. गुलाल उधळत त्यांनी मिळून डान्स केला. यादरम्यान वडेट्टीवार गटाकडून देखील धानोरकरांविषयी भाष्य करण्यात आले, धानोरकरांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर थेट वडेट्टीवारांविरोधात तोफ डागली. धानोरकरांनी आपण वडेट्टीवारांच्या विधानसभा मतदार क्षेत्रात आमदारकीची निवडणूक लढतो आणि आपण माझ्या जागी खासदारकीची निवडणूक लढवून दाखविण्याचे आव्हान दिले. तसेच वडेट्टीवार पालकमंत्री झाल्यापासून कुठल्या काँग्रेस कार्यकर्त्याचे कुठले काम केले हे सांगण्याचेही थेट आव्हान दिले. धानोरकरांच्या नाराजीनाट्यानंतर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. भाजप सोबत हातमिळवणी करण्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.