चंद्रपूर- घरी वयोवृद्ध कर्करोगग्रस्त वडील, वाताच्या त्रासाने औषधांवर असलेली आई, वडिलांचा लळा लागलेली 2 वर्षांची चिमुकली आणि गर्भवती पत्नी. अशावेळी कोरोनाच्या संशयित रुग्णांना हाताळणाऱ्या वॉर्डात काम करत असलेल्या डॉक्टरला घरी जाताना नेमके काय वाटत असेल? आपल्यासह संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून हा डॉक्टर कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या वॉर्डात आपले कर्तव्य बजावत आहे. डॉ. सचिन दगडी यांच्याप्रमाणेच त्यांच्या नेतृत्वात काम करत असलेले डॉक्टर्स, परिचारिका यांची परिस्थिती देखील अशीच आहे.
डॉ. सचिन दगडी हे कुटुंब आणि रुग्ण हे दोन्ही सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. विलगीकरण कक्षात काम करत असलेले डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी कुठल्या परिस्थितीत काम करतात, यासाठी त्यांना कुठला संघर्ष करावा लागतो ह्याची जाणीव एक समाज म्हणून आपल्याला असणे आवश्यक आहे.
'हे' आहेत कोरोनाशी दोन हात करणारे चंद्रपुरचे शिलेदार देशात जेव्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. अशा संशयित रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली. येथे येणारा रुग्ण हा कोरोनाबाधित आहे का? हे सांगणे अत्यंत कठीण आहे. अशा रुग्णांशी थेट संपर्क येतो त्यामुळेच याचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक. चंद्रपूरमध्येही अशा कक्षाची निर्मिती होणार होती. अनेक डॉक्टरांना यासाठी विचारण्यात आले. मात्र, डॉक्टरांमध्येही भीती पसरली होती. अनेकांनी यासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत आपली जबाबदारी ओळखून काही डॉक्टर पुढे आले. आज त्यांच्यावर कोरोना संशयित रुग्णांना तपासण्याची जबाबदारी आहे. चोवीस तास त्यांना उपलब्ध असावे लागते. 'हे' आहेत कोरोनाशी दोन हात करणारे चंद्रपुरचे शिलेदार कोरोना ऍक्शन फोर्स ही चमू डॉ. सचिन दगडी यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आली. यामध्ये छातीरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ राजूरकर, नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. आशिष पोडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. भालचंद्र फलके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती श्रीरामे, शल्यचिकित्सक डॉ. ललित तामगडे, समन्वयक डॉ. भास्कर सोनारकर यांचा समावेश आहे. ही चमू 24 तास कर्तव्यावर आहेत. रुग्ण तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभाग तयार करण्यात आला आहे. कोरोनासदृश लक्षणे असली तर त्याच्या गळ्यातील लाळेचा नमुना घेऊन तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येतो. यानंतर अशा रुग्णाला विलगीकरन कक्षात ठेवण्यात येते. आणखी गंभीर रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवले जाते. हे अत्यंत जोखमीचे काम आहे. अशा रुग्णांना पीपीई किट लावूनच हाताळले जाते. सुरुवातील किटचा तुटवडा असल्याने एचआयव्ही रुग्णांना तपासणीसाठीच्या किटचा उपयोग करावा लागत होता. मात्र, आता पीपीई किट उपलब्ध आहेत. ही किट घातल्यावर आठ तास उतरवता येत नाही. यादरम्यान त्यांना पाणीही पिता येत नाही, लघुशंका करायला जाता येत नाही. किट वॉटरप्रूफ असल्याने आत घामानेच कितीदा अंघोळ होऊन जाते. मास्कमुळे गुदमरल्या सारखे होते, नीट श्वासही घेता येत नाही. आवाज जात नसल्याने ओरडून बोलावे लागते. फोनवर बोलता येत नाही. अशी एकंदरीत अडचण आहे.
सुदैवाने चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मात्र, जोखीम अद्यापही कायम आहे. लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्तींना कुठल्याही संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. कुटुंबात असे सदस्य असतानाही हे डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉ. दगडी यांचे वडील कॅन्सरचे रुग्ण आहेत. आईला वाताचा त्रास, 2 वर्षांची मुलगी तर पत्नी गर्भवती आहे. मुलीला वडिलांचा लळा आहे, वडील दिसताच ती त्यांच्याकडे धावत सुटते. या भीतीने घरी ते जपूनच जातात. आधी स्वतःला निर्जंतुक करून, घराच्या आवारात कपडे काढून ते स्नानगृहात जातात. अंघोळ केल्यावरच ते घरात पाय ठेवतात. मात्र, या दरम्यानही चिंता कायम असते. डॉ. आशिष पोडे हे थेट रुग्णाच्या समोर उभे राहून नमुने गोळा करतात. यात सर्वात जास्त जोखीम आहे. त्यांच्या घरी आईवडील, पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. त्यांनाही घरात जाताना याच मानसिक स्थितीतुन जावे लागते.
डॉ. राजूरकर हे छातीचे तज्ज्ञ आहेत त्यांनाही हा धोका पत्करूनच घरी जावे लागते. सोबत इतर डॉक्टर मंडळी आणि परिचारिका यांना देखील ही स्थिती लागू आहे. मात्र, तरीही ही चमू आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठीचे चंद्रपुरातील हेच खरे शिलेदार आहेत.