महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालकाचा जीव वाचविण्यासाठी 'झिबली'ची नागाशी झुंज; सापाला मारुनच सोडले प्राण - चंद्रपूर नाग बातमी

झिबली जरा हटके स्वभावाची कुत्री होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आकोला परिसरात तिचे अनेकजण चाहते झाले होते. झिबली नुसती माणसाळलेली नव्हती तर तिने मानवी स्वभावाशी, मानवी संवेदनेशी समरसता साधली होती.

dog-killed-snake-to-save-the-owner-in-chandrapur
मालकाचा जीव वाचविण्यासाठी 'झिबली'ची नागाशी झुंज

By

Published : Jun 19, 2020, 3:06 AM IST

चंद्रपूर- शेतात राबणाऱ्या मालकाकडे जाणाऱ्या विषारी नागावर 'झिबली' नावाची कुत्री तुटून पडली. शेवटच्या श्वासापर्यंत तिने धाडसी झुंज दिली. यादरम्यान तिला नागाने अनेकदा दंश केला. मात्र, नागाचा फडशा पाडूनच तिने अखेरचा श्वास घेतला. झिबलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात गुरुवारी घडली. भास्कर चवले यांची ही कुत्री होती. त्यांनी बारा वर्षापूर्वी ते पिल्लू आणले. त्यांचा मुलगा निखीलने त्या पिल्लाचं झिबली असे नामकरण केले. झिबली मोठी होऊ लागली. आणि तिने आपले गुण दाखविणे सुरू केले. अनेकदा झिबलीने रानडुकरांना पिटाळून लावले. सात-आठ वर्षापूर्वी काही कुत्र्यांसह तिने एका रानडुकराचा फडशा देखील पाडला होता. याच पद्धतीने अनेकदा विषारी सापांना यमसदनी धाडले होते.


झिबली जरा हटके स्वभावाची कुत्री होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आकोला परिसरात तिचे अनेकजण चाहते झाले होते. झिबली नुसती माणसाळलेली नव्हती तर तिने मानवी स्वभावाशी, मानवी संवेदनेशी समरसता साधली होती. झिबलीला जेव्हा अन्न मिळायचे, तेव्हाच ती जेवण करायची. तिच्या प्रामाणिकपणाचे अनेक उदाहरणे सांगण्यासारखे आहेत.

झिबली

भास्कर चवले, त्यांची पत्नी शशिकला, मुले अनिकेत आणि निखील शेतात काम करीत होते. झिबली शेतात खेळत होती. तेवढ्यात सिताबाई उमरे यांच्या शेताकडून एक नाग आपल्या मालकाच्या दिशेने झिबलीला येताना दिसला. आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने तिचे दोन मित्रही मदतीला धावले. तेव्हा मात्र झिबलीने नागाचा फडशा पाडला होता. झिबलीलाही नागाने दंश केला. काही वेळानी चवले कुटुंबियांना ही होत असलेली झटापट लक्षात आली. त्यामुळे हातचे काम टाकून ते सर्वच धावले. त्यावेळी झिबलीच्या तोंडात मृत नाग असल्याचे त्यांना दिसले. चवले परिवार झिबलीला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना तिने आपले प्राण त्यागले.

झिबली आणि नागाच्या झुंजीची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. अनेकजण तिला पहायला शेतात आले. झिबलीच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण गाव हळहळले. तिची अचानक झालेली एक्झिट सर्वांना चटका लावून गेली. त्यानंतर झिबलीची अंतयात्रा काढून शेतात पुरण्यात आले. आपल्या मालकाचा जीव वाचविण्यात झिबलीला वीरमरण प्राप्त झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details