चंद्रपूर -बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यासाठी जिल्ह्यात 22 शीघ्र कृती दलाची निर्मिती करण्यात आली आहे. अशी अटीतटीची स्थिती असतानादेखील जिल्ह्यातील निवडक कोंबडबाजारांना ते सुरू ठेवण्याची अलिखित परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे. त्यामुळे बर्ड फ्लूची साथ उंबरठ्यावर असतानादेखील कोंबडबाजाराचा अवैध धंदा सुरू राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
यात्रेसारखे स्वरूप
या वर्षी कधी नव्हे ते अचानक जिल्ह्यात कोंबडबाजाराला ऊत आला. यापूर्वी देखील लपूनछपून जिल्ह्यात कोंबडबाजार सुरू असायचा, मात्र या वर्षी त्याला व्यापक स्वरूप आले. पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद आणि त्यावर राजकीय वरदहस्त यातून जिल्ह्यात कोंबडबाजाराचे पीक आले. यात कोरपना तालुक्यातील विरुर-गाडेगाव, भद्रावती तालुक्यातील तिरवंजा, राजुरा तालुक्यातील आर्वी, दुर्गापूर परिसरातील पद्मापूर रस्ता, रामनगर पोलीस ठाण्यातील हद्दीतील वायगाव, चंद्रपूर शहरातील लालपेठ कॉलरी ही नावे सर्वाधिक चर्चेत राहिली. ह्या सर्व कोंबडबाजारांचे एखाद्या यात्रेला लाजवेल असे स्वरूप होते. कोंबड्यांच्या जीवघेण्या लढाईसोबत येथे मोठ्या प्रमाणात जुगार देखील खेळावला जाऊ लागला ज्याची रोजची उलाढाल ही कोट्यवधीच्या घरात होती. आठवड्यात चार दिवस हा कोंबडबाजार सुरू असायचा. राजकीय वरदहस्त आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने कोंबडबाजार चालकांना मोकळे रान मिळाले. मात्र, ईटीव्ही भारतने जिल्ह्यात अवैधरित्या चालणाऱ्या कोंबडबाजाराविरोधात सातत्याने वृत्तांकन केले.