चंद्रपूर- राज्यातील शिक्षण क्षेत्रातील संस्था प्रथम एज्युकेशन फॉउन्डेशनद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्याकरता लोकसहभागातून 'आमचे गाव' हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. चिमूर तालुक्यातील खापरी (धर्मु) येथे प्रथम संस्थेंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना रटाळ अभासक्रमाव्यतिरिक्त गावातच हसत खेळत अभ्यास व्हावा यादृष्टीने भिंती रंगवण्यात आल्या. गावात मुले खेळण्याच्या अनेक ठिकाणी या बोलक्या भिंतींनी गावालाच शाळेचे स्वरूप आहे. या भिंतीच फळे बनल्या आहेत.
चिमूर तालुक्यातील तिसगावात प्रथम संस्थेच्यावतीने मागील २ वर्षांपासून या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. प्रत्येक मूल शाळेत शिकेल व टिकेल हे ब्रीद ध्येय समोर ठेवून हा उपक्रम सुरू केला गेला आहे. गावातील प्रत्येक समुदायाच्या मदतीने संघटितपणे शैक्षणिक विकास व्हावा, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे.