चंद्रपूर - माझे दारूचे दुकान आहे. शासनाने मला हा व्यवसाय करण्याचा परवाना दिला आहे. आजवर माझ्यावर अवैध दारू तस्करीचा एकही गुन्हा नाही. तरीही माझ्या विषयी अत्यंत खालच्या पातळीवरुन अपप्रचार भाजपकडून केला जात आहे. मी तर एक अत्यंत छोटा विक्रेता आहे, मग दारूचे कारखाने चालविणाऱ्या राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे कोण ? त्या प्रचाराला अहिरांना कशा चालतात? असा सवाल काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी उपस्थित केला.
मी दारुविक्रेता तर दारूचा कारखाना चालविणाऱ्या पंकजा मुंडे कोण? धानोरकरांचा अहिरांना सवाल
सोशल मीडियातुन अहिर हे कोळसा तस्कर असल्याचे तर बाळू धानोरकर हे दारु तस्कर असल्याचा प्रचार केला जात आहे. यावर आता धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, भाजपकडून एकमेकांवर आरोप केले जात आहे. सोशल मीडियातुन अहिर हे कोळसा तस्कर असल्याचे तर बाळू धानोरकर हे दारु तस्कर असल्याचा प्रचार केला जात आहे. यावर आता धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदारकीच्या निवडणुकीपासूनच मी दारुविक्रेता असल्याचा प्रचार केला जात आहे. मात्र, हे दुकान माझे अधिकृत आहे. शासनाने याचा रीतसर परवाना दिला आहे. शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात भाजपच्या अनेक नेत्यांचे दारूचे दुकाने, बार आहेत. यावर एकही भाष्य न करता केवळ मलाच टार्गेट केले जात आहे. वणीचे नगराध्यक्ष वीरेंद्र बोर्डे, सभापती शालीक उरकुडे, नगरसेवक चंदर खेरवानी, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक जयस्वाल यांचा दारूचा मोठा व्यवसाय आहे. मग यावर अहिर का बोलत नाहीत ? मी तर एक छोटा विक्रेता आहे, तर माझ्यावर एवढं बोललं जात आहे. मग आपल्या प्रचारासाठी येणाऱ्या राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे दारूचे २ मोठे कारखाने आहेत. त्या तुम्हाला कशा चालतात? असेही ते म्हणाले. अहिर हे कोळसातस्कर आहेत असा गंभीर आरोप सुद्धा धानोरकरांनी केला.