चंद्रपूर - सन २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी)चा कॉलम नाही, यावरून देशात आंदोलने सुरू आहेत. शहरी भागातून 'ओबीसींचा कॉलम नाही, तर सहभाग नाही' अशी भूमिका घेत ओबीसी बांधव मोर्चे काढत आहेत. अशात जिल्हाच्या टोकावर असलेल्या संतनगरीतून ओबीसींचा जनगणनेसाठी आवाज बुलंद झाला आहे. धाबा ग्रामपंचायतने होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची गणना करा, असा ठराव घेतला आहे. जनगणनेसाठी ठराव घेणारी धाबा ग्रामपंचायत ही जिल्ह्यात पहिली ठरली आहे.
सन २०२१ मध्ये राष्ट्रीय जनगणना होत आहे. या जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्याने ओबीसी बांधव संतप्त झाले आहेत. देशात, राज्यात, शहरातून ओबीसींची गणना करा यासाठी निदर्शने काढून सरकारचा विरोध केला जात आहे. जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही तर आमचा जनगणनेत सहभाग नाही, असे नारे देत विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. अशातच जिल्ह्यातील संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा ग्राम पंचायतेतून ओबीसींचा जनगणनेसाठी आवाज बुलंद झाला आहे. ओबीसींची जनगणना करा, असा ठराव धाबा ग्रामपंचायतेने घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्य संतोष झाडे यांनी मासिक सभेत या ठरावाचा प्रस्ताव ठेवला होता. सरपंच रोषणी अनमुलवार, उपसरपंच राजेश गोहणे, सुनिता प्रतापगिरीवार, शालिनी सांगडे, सुरेखा येलमुले, रामकृष्ण सांगडे, हिराचंद कंदीकुरवार यांनी यासाठी सहमती दिली. तर, ओबीसींची जनगणना करा, असा ठराव घेणारी धाबा ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली ठरली आहे.