चंद्रपूर- कोरोनाच्या महासंकटाने सगळीकडेच हाहाकार माजला आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने माणसं एकमेकांपासून दूर जाऊ लागली आहेत. पण, अशातही राज्याच्या सिमेवरील एका तरूणाने या महासंकटात माणूसकीची मशाल पेटवली आहे. तेलंगणातून सिमेवर आलेल्या हजारो मजुरांना त्याने मदतीचा हात दिला आहे. कोरोनाला हरविण्यासाठी आपले 'कोरोना योद्धा' दिवसरात्र एक करत आहेत. अशावेळी या तरुणानेही मजुरांच्या राहण्याची व जेवणाची सोय करुन तोही 'कोरोना योद्धा' ठरला आहे.
देविदास सातपुते, असे या तरुणाचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणाच्या खम्मम व इतर जिल्ह्यात मिरची तोडीणीसाठी गेलेले हजारो मजुरांचे लोंढे महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवर वर्धा नदीकाठावरील पोडसा या गावात पोहचले. अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येत मजूर आल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या तरुणाने आपली मुख्य मार्गालगत असलेल्या व्यवसायाची खोली व जागा त्याने मजुरांसाठी दिली. तसेच प्रशासनाला मदतीचा हात देत तब्बल 6 दिवस हजारो मजुरांना घास भरवला.
मजुरांसाठी देविदासने स्वतःचे 15 क्विंटल तांदूळ, दिडशे लीटर तेल व जेवणासाठी लागणारे साहित्य सतत 6 दिवस पुरवले. तहसीलदार सिमा गजभीये यांनीही स्वत हजारो मजुरांच्या जेवनाची सोय केली. एवढेच नाही तर कर्तव्यावर असलेल्या आरोग्य व इतर यंत्रणेतील पन्नासहून अधिक कर्मचार्यांच्याही 6 दिवस जेवणाची सोय केली.
त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुरेश धोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, तहसीलदार सिमा गजभीये, ठाणेदार संदीप धोबे, लाठीचे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड, धाब्याचे ठाणेदार सुशील धोपटे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून गावोगावच्या हजारो मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले. यावेळी देविदास सातपुते यांनी सातत्याने प्रशासनाला मदतीचा हात दिला.