चंद्रपूर- गोंडपिंपरीत दिवंगत लाईनमॅनच्या वयोवृद्ध पत्नीला एका महिन्याचे बिल सव्वादोन लाखाहून अधिक आले आहे. एवढेच काय त्यांचे दुसरेही बिल तेवढच आले आहे. वीज वितरण विभागाच्या या सावळ्या गोंधळाने त्रस्त झालेल्या वयोवृद्ध महिलेन बिल तर कमी करून आणले. मात्र, पुन्हा वीज विभागाकडून झटक्यावर झटके सुरूच राहिले. त्यामुळे तिने बिल न भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विभागाने लाईन कापली. आता ती आपल्या परिवारासह अंधरात जीवन कंठीत आहे.
गोंडपिंपरीच्या धाबा मार्गावर कौशल्याबाई खटुजी उईके या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे पती खटूजी उईके हे विद्युत विभागात लाईनमॅन होते. अनेक वर्ष त्यांनी विभागात सेवा दिली. त्याचवेळी त्यांनी येथील बाबूराव झाडे यांच्याकडून घर विकत घेतले. काही वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर अतिशय काटकसर करून कौशल्याबाई आपल्या संसाराच गाडा चालवित आहेत. अशात गेल्या चार महिन्यापासून महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने त्या प्रचंड हैराण झाल्या आहेत. नेहमी पाच-सहाशे येणारे विद्युत बिल हाती पडले तेव्हा त्यांना धक्काच बसला. बिल होते सव्वादोन लाखाहून अधिक. विद्युत कंपनीच्या कार्यालयात अनेकदा खस्ता खात त्यांनी बिल कमी केले. पण दुसऱ्या महिन्यातही तसेच झाले. यावेळी बिल आले ते २ लाख २३ हजार ७९० इतके.