महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर शहरात भरदिवसा गोळीबार; एक गंभीर, चार आरोपी फरार - Chandrapur gun firing news

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाला बल्लारपूर येथील बहुचर्चित सुरज बहुरीया हत्याकांडाची किनार आहे अशी चर्चा आहे.

firing in Chandrapur
रघुवंशी कॉम्प्लेक्स

By

Published : Jul 12, 2021, 7:47 PM IST

Updated : Jul 12, 2021, 8:13 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. आज(12 जुलै) चंद्रपूर शहराच्या मध्यभागी भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे हा सर्व थरार घडला.

घटनास्थळावरील दृश्य

एका युवकाला मारण्यासाठी चार आरोपी या कॉम्प्लेक्समध्ये घुसले. त्यातील एक बुरखा घालून होता, ज्याने समोरच्या व्यक्तीवर थेट गोळीबार केला. यानंतर हे सर्व चारही आरोपी पळून गेले. या प्रकरणाला बल्लारपूर येथील बहुचर्चित सुरज बहुरीया हत्याकांडाची किनार आहे. जखमी झालेला आकाश अंदीवार याचा सूरज बहुरीया प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. त्यामुळे बहुरीया हत्याकांडाचा वचपा काढण्यासाठी हा खून करण्याचा प्रयत्न होता अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारी -

चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी जगताने डोके वर काढणे सुरू केले आहे. यापूर्वी बल्लारपूर येथे वडिलाने आपल्या दोन मुलांवर गोळ्या घालून स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली होती. यानंतर चंद्रपूर येथील काँग्रेसचा कार्यकर्ता मनोज अधिकारी याचा एका फ्लॅटमध्ये निर्घृणपणे खून करण्यात आला. यानंतर देखील हे खुनी गुन्हेगारीचे सत्र थांबले नाही. बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सूरज बहुरीया याचा भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याच खुनाच्या पार्श्वभूमीवर आजची घटना घडली अशी माहिती आहे. या हत्याकांड प्रकरणाचा संबंध आकाश अंदीवारशी होता, अशी माहिती आहे. आज आकाश आझाद बगीच्याजवळ असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आला असता, त्याच्या मागावर असलेल्या चार जणांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. यातील एक बुरखा घालून आला होता. त्याने एकामागून एक अशा तीन गोळ्या आकाशवर झाडल्या. या हल्ल्यात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आकाश जिवाच्या आकांतानाने पळाला. मात्र, त्याला तीन गोळ्या लागल्या. एक गोळी हातावर तर दोन गोळ्या त्याच्या पाठीला लागल्या. तो पळत जाऊन एका मोबाइलच्या दुकानात शिरला. त्यामुळे तो बचावला.

  • आरोपी फरार -

दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर लगेच घटनास्थळावरून पसार झाले. फरार आरोपींचे नाव मंगेश बावणे, छोटू सूर्यवंशी असे आहेत. तर अन्य दोघांची ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हे घटनास्थळी दाखल झाले. युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळ्या झाडतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Last Updated : Jul 12, 2021, 8:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details