चंद्रपूर- दिवाळीच्या सणासाठी केलेल्या रोषणाईच्या लख्ख उजेडात गाव उजळून निघली आहेत. मात्र, या उजेडात बळीराजाचा घरातील काळोख अधिकच गर्द झाला आहे. मागील आठवडाभरात परतीचा पावसाने कहर केला. यामुळे तोंडाशी आलेले धान पिकाचे नुकसान झाले. वर्षभर गोळा केलेली पुंजी, वेळ आणि प्रसंगी कर्ज काढून बळीराजाने शेती उभी केली. पण निसर्ग कोपला, त्यात दिवाळी आली. हातात पैसा नाही, पिकही गेले यामुळे बळीराजासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, कोरपणा, जिवती, गोंडपिपरी तालूक्यात परतीचा पावसाचा कहर सुरू आहे. मागील आठवडाभरात सलग तिन वेळा वादळी पावसाने या परिसराला झोडपले. पावसाचा फटका शेतात उभे असलेल्या धान पिक आणि कपाशी बसला आहे. काही दिवसात हातात येणारे धान पिक अक्षरशः जमिनीवर लोळले.
कपाशी पिकांचीही तीच गत झाली आहे. कपाशीचा फुलांना वादळी पावसामुळे गळती लागली आहे. कोपलेल्या निसर्गाने बळीराजाचे अतोनात नुकसान केले आहे. वर्षभरात जमा केलेली पुंजी शेती उभी करण्यासाठी बळीराजाने खर्च केली. वेळ प्रसंगी बँक, बचत गट आणि वैयक्तिक कर्जही बळीराजाला काढावे लागले. या हंगामात पाऊस बरा झाला. त्यामुळे धान पीक जोमात आले. पावसाचा थोळाफार फटका कपाशीला बसला. लागलेला खर्च निघेल अशी स्थिती कपाशी पिकाची होती. आता मात्र परतीचा पावसाने पिके भुईसपाट केली.