चंद्रपूर -कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अन्न व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे करण्यात येत आहे. या अंतर्गत रास्त भाव दुकानातून शिधा वस्तूचे वितरण करताना लाभार्थ्याची बायोमेट्रिक पडताळणीसाठी अंगठे करावे लागणार नाहीत. रास्तभाव दुकानदारच ई - पॉस मशीवर अंगठा देऊन शिधा वस्तुंचे वितरण करणार आहेत. ही योजना फक्त ३१ मार्च पर्यंतच राहणार असल्याचे परिपत्रक विभागाकडून काढण्यात आले आहे.
कोरोना इफेक्ट : रास्त भाव दुकानात ग्राहकाना करावा लागणार नाही अंगठा
कोरोना विषाणूचा प्रसार रोऊ नये आणि सार्वजनिक व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अन्न आणि ग्राहक संरक्षण विभागाद्वारे करण्यात येत आहेत. या अंतर्गत शिधा घेताना बायोमेट्रिक पडताळणीसाठी अंगठा करायची गरज नाही.
जागतीक आरोग्य संघटना व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे कडून मार्गदर्शक सुचना देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही ४१ रुग्ण आढळले त्यापैकी एकाचा मृत्यु झाला आहे. कोरोणाच्या संसर्गावर प्रतिबंध व नियंत्रण करता तातडीच्या आपातकालीन उपाय योजना शासनस्तरावरून करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधीत रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, त्याचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून सर्व रास्त भाव दुकानामधून शिधा वस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी काही मार्गदर्शक सुचनाचें परिपत्रक १७ मार्चला काढण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सुचनेनुसार रास्त भाव दुकानदारांनी शिधा लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा १७ मार्चपासुन ई - पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई -पॉस उपकरणावर बोट/ अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही व त्यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल. रास्त भाव दुकानावर गर्दी होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात यावी याकरता टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच धान्य घेण्यास आलेल्या लाभार्थी उचित अंतर ठेवून रांगेत उभे राहतील याची दक्षता दुकानदारांनी घ्यावी, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत .
या सुविधेद्वारे लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना धान्याचा अपहार/ अनियमितता होणार नाही, याची दक्षता रास्त भाव दुकानदारांनी घ्यावी. वाटप केलेल्या धान्याची जबाबदारी रास्त भाव दुकानदाराची राहील. वरील सुविधा ३१ मार्च पर्यंतच लागू राहणार असल्याची माहीती चिमूर तालुका पुरवठा अधिकारी आशीष फुलके यांनी दिली.