चंद्रपूर - चिमूर वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बोरगाव शेत शिवारातील पुरुषोत्तम नन्नावरे यांच्या गोठ्यात बांधलेली गाय वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. नागरी वस्तीनजीक वाघाच्या वास्तव्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, बोरगाव शेत शिवारातील घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बोरगाव शेत शिवारात गोठ्यात बांधलेली गाय वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिमूर वनविभागाला माहिती देण्यात आली.
चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील कवडशी ( रोडी ) लगत असलेल्या बोरगाव (रिठी) परिसरात जंगली श्वापदांचा वावर नेहमीच असतो. मागील वर्षी याच भागात वाघाने म्हैस मारली होती. चिमूर येथील नेताजी वार्डमध्ये राहणाऱ्या पुरुषोत्तम नन्नावरे यांची बोरगाव शेत शिवारात शेती आहे. शेतातच गायी बैलांकरता ताटव्यांचा गोठा बांधलेला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे बैल, गायींना चारा टाकण्याकरिता पुरूषोत्तम शेतात गेले असता गोठ्याला भगदाड पडलेले दिसले. त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता गाय मृतावस्थेत दिसून आली.
वाघाने हल्ला करून गाय मारल्याची माहिती चिमूर वनविभागाला देण्यात आली. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. परिसरात वाघ आणि बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयग्रस्त असून वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याच हंगामात या श्वापदांचा वावर वाढत असल्याने शेतीची कामे कशी करावी व जनावरांची सुरक्षितता याविषयी प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.