चंद्रपूर -ज्यावेळी कोरोनाने हाहाकार माजवला होता तेव्हा काम करायला कोणी पुढे धजावत नव्हते. त्यावेळी आम्ही जिवाची पर्वा न करता कोरोना योद्ध्दा म्हणून काम केले. संपूर्ण संचारबंदी असताना वाहने मिळत नव्हती, अनेक किलोमीटर पायदळी चालत आम्ही हे काम करत होतो. पण, मागील सात महिन्यांचे वेतन आम्हाला मिळाले नाही. म्हणून आम्ही आपल्या मुलाबाळांना घेऊन आंदोलनाला बसलो. दोन महिने लोटले तरी वेतन मिळाले नाही. त्यावर पालकमंत्री वडेट्टीवार हे आम्हाला झोडपून काढण्याची भाषा करतात. आम्हाला झोडपून काढावे आणि सर्व 500 सफाई कामगारांना विषाचा प्यालाही त्यांनी द्यावा. या भाषेत या महिला सफाई कामगारांनी वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोनाच्या काळात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे सात महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यासाठी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मागील दोन महिन्यांपासून 500 महिला सफाई कामगार हे आंदोलनाला बसले आहे. आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दोन महिन्यांपासून या सर्व महिला कामगार डेरा आंदोलन करतआहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. मात्र, जोवर थकीत वेतन मिळत नाही तोवर कामबंद आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
वडेट्टीवारांनी कोरोना योद्ध्यांची माफी मागावी - आंदोलनकर्ते